पुणे, ता. ९ : पालखीकाळात तातडीची गरज म्हणून निविदा प्रक्रिया न राबविता महापालिकेच्या पथ विभागाने २ कोटी १४ लाख रुपयांचा निधी रस्ते दुरुस्तीसाठी खर्च केला. वारी झाल्यानंतर तीन महिन्यांनी ठेकेदाराने स्थायी समितीत प्रस्ताव आणून तो मंजूर करून घेतला.
पुण्यात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालख्या मुक्कामी येतात. या पालख्यांसोबत लाखो वारकरी पायी चालत पुण्यात दाखल होतात. त्यामुळे महापालिकेतर्फे दरवर्षी पालख्यांच्या आगमनापूर्वी रस्ते दुरुस्ती केली जाते. यंदा १२ मे ते १८ जूनदरम्यान पालखी मार्गावरील रस्ते दुरुस्तीची कामे करण्यात आली. याचकाळात महापालिकेच्या पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीच्या कोट्यवधी रुपयांच्या अनेक निविदा मंजूर केल्या आहेत.
असे असताना पालखी मार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी विनानिविदा कामे करून घेण्यात आले आहेत. या कालावधीमध्ये अवकाळी पावसामुळे हॉटमिक्स प्लांट बंद होता, म्हणून तातडीने कामे केली, असा खुलासा पथ विभागाने प्रस्तावात केला आहे. परंतु, प्रत्यक्षात १० मेपासूनच अवकाळी पावसाला सुरवात झाली होती. दीड महिना हॉटमिक्स प्लांट बंद होता का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच ही कामे तत्कालीन आयुक्तांच्या मान्यतेनंतर लगेच प्रस्ताव समितीत आणायला हवा होता. मात्र, कार्यपत्रिकेवर न आणता थेट मंजुरीसाठी ठेवून तीन महिन्यांनी तो प्रस्ताव ‘तातडीची बाब’ म्हणून मंजूर करण्यात आला.
ठळक मुद्दे
- २ कोटी १४ लाखांची कामे निविदेशिवाय पूर्ण
- १२ मे ते १८ जूनदरम्यान पालखीकाळात रस्ते दुरुस्ती
- याचकाळात निविदा काढून अन्य ठिकाणी स्वतंत्र कामे
- अवकाळी पावसाचा हवाला देऊन तातडीचा दावा
- प्रस्ताव तब्बल तीन महिन्यांनी समितीत मंजूर