पुणे, ता. ९ : इयत्ता अकरावीच्या प्रवेशप्रक्रियेत ‘सर्वांसाठी खुल्या’ (ओपन टू ऑल) या विशेष फेरीअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बुधवारपर्यंत (ता. १०) मुदत आहे. या प्रक्रियेत ‘कॅप’ फेरीअंतर्गत जवळपास १२ हजार ९० विद्यार्थ्यांचे मंगळवारपर्यंत प्रवेश झाले आहेत.
राज्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील नऊ हजार ५४४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीच्या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जात आहे. यासाठी एकूण १४ लाख ८३ हजार ३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यातील १३ लाख २४ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश निश्चित केले आहेत. सर्वांसाठी खुल्या या विशेष फेरीमध्ये एकूण १५ हजार ३२० विद्यार्थ्यांना त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले आहेत. त्यातील १२ हजार ९० विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रवेश निश्चित केला असून उर्वरित विद्यार्थ्यांना बुधवारपर्यंत प्रवेश घेता येणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.