पुणे, ता. १९ : ‘‘गणेशोत्सव उत्साहात, शांततेत पार पाडण्यासाठी पोलिस दलासह सर्व विभागांकडून प्रयत्न सुरू आहेत. विसर्जन मिरवणुकीसह उत्सवातील उर्वरित नऊ दिवसही नियोजन करणे महत्त्वाचे आहे. मानाच्या आणि काही महत्त्वाच्या मंडळांमध्ये विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्याच्या मुद्द्यावर आपसात कटुता दिसून येत आहे, ही खेदाची बाब आहे. परंतु सर्व गणेश मंडळे आमच्यासाठी समान आहेत. सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन त्याचे निराकरण करण्यासाठी शहर पोलिस दल प्रयत्नशील आहे. काही वाद असल्यास गणेश मंडळांचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रतिष्ठित नागरिकांशी चर्चा करून समन्वयाने येत्या २५ ऑगस्टपर्यंत निश्चित मार्ग काढू,’’ अशी ग्वाही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी दिली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांतर्फे आयोजित बैठकीत पोलिस आयुक्त अमितेश कुमार, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, जिल्हाधिकारी जितेंद्रकुमार डुडी, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील, राजेश बनसोडे, पंकज देशमुख यांच्यासह आणि गणेश मंडळांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अमितेश कुमार म्हणाले, ‘‘गणेशोत्सवात पोलिस, महापालिका, महावितरण आणि जिल्हा प्रशासनासह सर्व विभागांचा समन्वय राहील. पावसाळ्याचे दिवस असल्याने शॉर्टसर्किटसारख्या घटना टाळण्यासाठी महावितरण आणि मंडळांनी खबरदारी घ्यावी. मंडळांनी आक्षेपार्ह देखावे टाळावेत. विसर्जन मिरवणुकीत अवैध दारू विक्रीचा कोणी प्रयत्न केल्यास त्यांच्यावर आणि संबंधित मद्य विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अनुचित प्रकार टाळण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. स्थानिक पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या भागातील मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची स्वतः भेट घ्यावी. मंडळांचे व्हॉटस ॲप ग्रुप तयार करावेत. वाहनांचे पार्किंग, स्वयंसेवक यांचे सूक्ष्म नियोजन करावे.’’ मंडळांकडूनही पोलिसांना योग्य सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
चेंगराचेंगरी टाळण्यासाठी करा नियोजन
दहीहंडीच्या दिवशी शहराच्या मध्य भागात चेंगराचेंगरीसदृश स्थिती निर्माण झाली होती. या घटनेची आयुक्त अमितेश कुमार यांनी गांभीर्याने दखल घेतली. या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणुकीत चेंगराचेंगरीसारख्या घटना टाळण्यासाठी पेठांमध्ये पादचाऱ्यांसाठी अनावश्यक ‘नो एंट्री’ काढावेत. भाविकांच्या गर्दीचे सूक्ष्म नियोजन करावे. त्यासाठी वाहतूक विभाग, वायरलेस विभाग आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठक बोलावून तातडीने योग्य मार्ग काढावा, असे निर्देश त्यांनी दिले.
नियोजनासाठी समन्वयावर भर द्यावा
दरम्यान, बैठकीच्या प्रारंभी उत्सव नियोजनातील दुहेरी भूमिका, समन्वयाचा अभाव आणि प्रशासनाची अनास्था या मुद्द्यांवर मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने केवळ सूचना न देता उत्सव उत्साहवर्धक होण्यासाठी प्रत्यक्ष कृती करावी. प्रशासनाने सकारात्मक आणि सहकार्याची भूमिका घेण्याची वेळ आली आहे, अशी भावना या बैठकीत व्यक्त झाली.
विघ्नहर्ता न्यासाचे विश्वस्त प्रा. डॉ. मिलिंद भोई यांनी गणेशोत्सवात महापालिका, महावितरण व पोलिस अधिकारी व दक्षता कक्षांचे मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करावेत, अशी मागणी केली. सुरेश जैन यांनी विसर्जन मिरवणुकीला इच्छुक मंडळांना सकाळी सात वाजता परवानगी देण्याची सूचना मांडली. गणेश भोकरे यांनी, मानाच्या आणि इतर मंडळांना वेगवेगळा न्याय नको. काही व्यावसायिक लोक उत्सवाचे व्यापारीकरण करत असून त्यांना थारा देऊ नये, अशी सूचना केली. पुष्कर तुळजापूरकर, सुनील कुंजीर, प्रवीण चोरबेले, ऋषिकेश बालगुडे, विशाल धनवडे यांनीही वेळी विविध सूचना केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.