पुणे, ता. १२ : ‘सीओईपी’ तंत्रज्ञान विद्यापीठाच्या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे अभियंतादिनानिमित्त ‘सीओईपी अभिमान पुरस्कार २०२५’ जाहीर करण्यात आला आहे. यंदा माजी शास्त्रज्ञ डॉ. वसंथा रामास्वामी यांना ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. यंदा विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या ‘सीओईपी’च्या सहा माजी विद्यार्थ्यांना ‘सीओईपी’ अभिमान पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते येत्या रविवारी (ता. १४) दुपारी दोन वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात होणार आहे.
या पुरस्कार सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे, ‘सीओईपी’ माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते उपस्थित होते. यंदा विलास जावडेकर डेव्हलपर्सचे संस्थापक व अध्यक्ष विलास जावडेकर, अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्सचे माजी अध्यक्ष डॉ. महांतश हिरेमठ, स्ट्रडकॉम कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक जयंत इनामदार, जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाचे अध्यक्ष उमेश वाघ, इलेक्ट्रोमेक मटेरिअल हॅंडलिंग सिस्टिम्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक तुषार मेहेंदळे, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हर्डीकर यांना ‘सीओईपी अभिमान पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे.
नूतन वास्तूचे उद्घाटन
‘‘अद्ययावत ग्रंथालय आणि संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन यावेळी होणार आहे. विद्यापीठाच्या आवारात सात मजली इमारत उभारण्यात आली आहे. ‘सीओईपी’च्या माजी विद्यार्थिनी (तुकडी-१०९८, संगणकशास्त्र) गौरी शहा यांचे राहते घर विकून त्यांच्या कुटुंबीयांनी जवळपास सहा कोटी रुपयांचा निधी संस्थेला दिला आहे. त्यातील पाच कोटी रुपये आणि राज्य सरकारने दिलेले ५१ कोटी रुपये या निधीतून ही इमारत उभारली आहे. यात तीन मजले सुसज्ज ग्रंथालय आणि चार मजले संगणक अभियांत्रिकी विभाग असणार आहे. विद्यापीठाचे ग्रंथालय २४ तास सुरू ठेवण्याचा मानस आहे. संगणक अभियांत्रिकी विभागाची नवीन इमारत अत्याधुनिक सुविधा आणि उच्च दर्जाच्या प्रयोगशाळा यामुळे नावीन्यपूर्ण संशोधन आणि तंत्रज्ञानातील नवकल्पनांचे केंद्र ठरेल,’’ असे डॉ. भिरूड यांनी सांगितले.