पुणे, ता. २३ : ‘‘मी व आनंद युवक क्रांती दलच्या जात-वर्ग-लिंग आधारित भेद नष्ट करून समताधिष्ठित समाज निर्माण करण्याच्या विचारांनी एकत्र आलो व १९७८ मध्ये नोंदणी पद्धतीने विवाहबंधनात अडकलो. परंतु, वीस वर्षे एकत्र संसार करून मतभेदामुळे आम्ही विभक्त झालो. मात्र, आमच्यात मनभेद कधीच नव्हते. त्यानंतरही आनंदने मला कायमच प्रोत्साहन दिले. त्याने माझ्यावर कधी टीका केली तर नाही, उलट अनेक प्रसंगी फोन करून आधार दिला,’’ अशा शब्दांत डॉ. नीलम गोऱ्हे यांनी डॉ. आनंद करंदीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
नामदार गोपाळकृष्ण गोखले रस्त्यावरील विद्यार्थी सहायक समितीच्या सभागृहात आयोजित डॉ. करंदीकर यांच्या श्रद्धांजली सभेत त्यांनी रविवारी भावना व्यक्त केल्या. विश्वास काळे, डॉ. करंदीकर यांचे आप्तेष्ट, मित्र परिवार व त्यांच्यासोबत काम केलेले विविध संघटनांमधील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘आनंदने ‘युक्रांद’चा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर आम्ही उदगीरला गेलो होतो, तर मी डॉक्टर पेशा स्वीकारून रुग्णसेवा करत होते. तेथे आनंदने सायकल रिक्षा युनियन बांधली होती. मराठवाडा विद्यापीठ नामांतर चळवळीत आम्हा दोघांनाही कमालनगर येथील कारागृहात ठेवले होते. त्या काळात आम्हाला मुक्ता झाली. आमच्यात मतभेद झाले असले तरी भांडण मात्र कधीही झाले नाही. मात्र, आनंद जेवढा निरीश्वरवादी होता तेवढी मी होऊ शकत नसल्याने व ही मर्यादा लक्षात आल्यानंतर एका वळणावर आम्ही विभक्त झालो. तरीही आमचा संवाद कायम होता.’’ दिल्ली येथील साहित्य संमेलनातील जेव्हा भाषण वादग्रस्त ठरले आणि त्यावेळी ट्रोल केले जात होते त्यावेळीही आनंदने फोन करून मी जे काही बोलले ते बरोबरच आहे, असे सांगून आधार दिला होता. तसेच विभक्त झालो तरीही करंदीकर कुटुंबासोबत नाते कधीच ताणले नाहीत. ससूनमध्ये आनंदने देहदान केले, अशाही आठवणी त्यांनी सांगितल्या.
यावेळी विविध संस्था संघटनांमधील कार्यकर्त्यांनी त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून दिली. डॉ. करंदीकर यांचे विचार प्रेरक असून ते माणूस शोधणारे व घडवणारे माणूस होते. त्यांनी कायमच गरीब व मागासवर्गीयांसाठी काम केले. ते स्वतःचा कमी, परंतु इतरांचा विचार जास्त करत होते. ते बुद्धिमान व प्रज्ञावान होते. त्यांनी आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्याबरोबरच प्रत्येक व्यक्तीला सन्मान देणे हा त्यांचा विशेष गुण होता. त्यांची प्रत्येक कृती वेगळी प्रेरणा देईल अशा भावना अनिता पवार, उमेश वाघ, त्रिवेणी गव्हाळे आदींनी व्यक्त केल्या. तसेच त्यांचे धाकटे भाऊ उदय करंदीकर यांनीही आठवणींना उजाळा दिला. प्रत्येकाच्या बोलण्यातून त्यांचा कंठ दाटून येत होता. त्यांची बहीण जयश्री काळे यांची मुलगी अमृता हिने पत्राद्वारे भावना मांडल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.