पुणे, ता. १९ : ‘विमा लोकपाल’ संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त पुणे केंद्रातर्फे ‘विमा लोकपाल दिवस’ उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास ‘विमा लोकपाल’ पुणे विभागाचे सुनील जैन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय सेठ, पुणे केंद्राच्या उपसचिव पार्वती अय्यर, सहाय्यक सचिव चंद्रकांत गंगावणे, विमा कंपन्यांचे प्रतिनिधी आणि पॉलिसीधारक उपस्थित होते. जैन यांनी विमा क्षेत्रातील वाढ आणि भारतीय अर्थव्यवस्थेतील भूमिकेविषयी मार्गदर्शन केले.
‘विमा लोकपाल’ ही एक अर्ध-न्यायिक तक्रार निवारण यंत्रणा आहे. तक्रारींचे निवारण हे किफायतशीर, कार्यक्षम आणि निःपक्षपाती पद्धतीने करणे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. संस्थेच्या वतीने जीवन, सामान्य आणि आरोग्य क्षेत्रातील विमा कंपन्या आणि विमा प्रतिनिधींच्या विरोधातील दाव्यांसाठी विमाधारकाकडून तक्रारींचे निवारण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नसल्याची माहिती आयोजकांनी दिली.