विश्वास पाटील हे मराठीतील प्रख्यात कादंबरीकार आहेत. मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील नेरले नावाच्या छोट्याशा खेड्यात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पाटील यांनी अनेक लोकप्रिय ऐतिहासिक कादंबऱ्यांचे लेखन केले आहे. वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्यांच्या विविध कादंबऱ्यांचे इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहे. साहित्यिक कार्यासह त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.
ऐतिहासिक कादंबऱ्या
१) पानिपत ः या ऐतिहासिक कादंबरीला अफाट लोकप्रियता लाभली असून, पाटील यांनी पानिपतच्या युद्धाबाबत वाङ्मयीन पटलावरून नवीन प्रमेय मांडले. या कादंबरीच्या लोकप्रियतेमुळेच त्यांना ‘पानिपत’कार म्हणूनही ओळखले जाते.
२) संभाजी ः छत्रपती संभाजी महाराजांच्या परंपरागत व्यक्तिरेखेच्या मांडणीला छेद देऊन एक बलदंड राजकीय पुरुष व छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हिंदवी स्वराज्य कणखरपणे सांभाळणारे शंभुराजे, असे विराट चित्र या कादंबरीतून मांडले. या दोन्ही कादंबऱ्यांनी खपांचे अनेक विक्रम केले.
३) महानायक ः सुभाषचंद्र बोस, जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील संघर्षावर आधारित राजकीय नाट्य व व्यक्तिगत परस्पर संबंधांचा यात धांडोळा घेतला आहे.
४) महासम्राट ः ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील कादंबरी मालिका असून, त्यापैकी ‘झंझावात’ आणि ‘रणखैंदळ’ हे दोन भाग प्रकाशित झालेले आहेत.
महत्त्वाच्या सामाजिक आणि राजकीय कादंबऱ्या
१) लस्ट फॉर लालबाग- १९८२ च्या गिरणी कामगारांच्या संपानंतरचे मन्वंतर
२) पांगीरा- समृद्धीकडून दुष्काळाकडे परिवर्तन झालेल्या एका खेड्याच्या ऱ्हासाची कथा
३) नागकेशर- सहकार, ऊस उद्योग आणि सार्वत्रिक निवडणुकांभोवती फिरणाऱ्या राजकीय खेळी व सामान्य कष्टकऱ्यांच्या वाट्याला आलेले दैन्य या विषयावरील कादंबरी
४) दुडिया- नक्षलवादाकडे वळलेली एक आदिवासी तरुणी आणि छत्तीसगडच्या पार्श्वभूमीवरची कथा
५) ग्रेट कांचना सर्कस- दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवरील कांचना नावाच्या एका सर्कसरागिणीच्या शौर्याची कहाणी
महत्त्वाचे सन्मान व पुरस्कार
- फेब्रुवारी २०२० मध्ये इंदिरा गोस्वामी साहित्य राष्ट्रीय पुरस्कार (आसाम)
- ‘झाडाझडती’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार; मोठ्या धरणांमुळे विस्थापित झालेल्या धरणग्रस्तांच्या जीवनावर व त्यांच्या पुनर्वसनाच्या समस्येवर आधारित या कादंबरीचा अनेक भाषांमध्ये अनुवाद
- राज्य सरकारचा सर्वोत्तम कादंबरी पुरस्कार (पांगीरा आणि महानायक अशा दोन पुस्तकांसाठी)
- राज्य सरकारचा नाट्यलेखन आणि नाट्यसमीक्षणासाठी पुरस्कार
- लोकमंगल सर्वोत्तम कादंबरी पुरस्कार (लस्ट फॉर लालबाग)
- भारतीय भाषा परिषद पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषद यांचे पुरस्कार
ग्रंथसंपदा
१) गाभूळलेल्या चंद्रबनात
२) नागकेशर
३) पानिपत
४) पांगीरा
५) झाडाझडती
६) चंद्रमुखी
७) लस्ट फॉर लालबाग
८) संभाजी
९) क्रांतिसूर्य
१०) महानायक
११) आंबी
१२) महासम्राट (खंड पहिला- झंझावात आणि खंड दुसरा-रणखैंदळ)
१३) दुडिया
१४) पानिपतचे रणांगण (नाटक)
१५) नॉट गॉन विथ द विंड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.