पुणे, ता. १४ : राज्यात आरक्षणाच्या मुद्यावर ‘अशी ही बनवाबनवी’ चित्रपट सुरू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठा व ओबीसी समाजाची ‘बनवाबनवी’ करत आहेत, अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी रविवारी केली. त्या विरोधात रस्त्यावर आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार आम्ही केला असून, महायुतीमधील मंत्री छगन भुजबळ यांच्याशीदेखील चर्चा करीत आहोत, असेही ते म्हणाले.
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून (ओबीसी) आरक्षण देण्यासाठी हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या ओबीसी सेलतर्फे काँग्रेस भवन येथे ओबीसी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. आमदार वडेट्टीवार, पक्षाच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष अनिल जयहिंद, आमदार सतेज पाटील, सेलचे राज्य अध्यक्ष भानुदास माळी यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी, माजी आमदार, नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीनंतर वडेट्टीवार व अनिल जयहिंद यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
वडेट्टीवार म्हणाले, ‘‘राज्य सरकार समाजाला मूर्ख बनवत असून सर्वांचे वाटोळे करत आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व हिसकावून घेतले गेले असून, या गरीब समाजाला आरक्षणाचे संरक्षण राहील का, अशी चिंता वाटू लागली आहे. ओबीसी तरुणांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावरची लढाई आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा निर्धार केला आहे. त्यासाठी १० ऑक्टोबर रोजी नागपूर आणि २० ऑक्टोबर रोजी संभाजीनगर येथे ओबीसी समाजाच्या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी महायुती सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्याशीही आम्ही चर्चा करत असून त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावे.’’
‘‘पहलगाम दहशतवादी हल्ल्याची घटना घडल्यानंतरही भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यांना प्रोत्साहन देणारा भारतीय जनता पक्ष दुतोंडी गांडूळ असून, त्याच्या दोन्ही बाजूला तोंड व शेपूट आहे. हा सामना पाहण्यासाठी जाणाऱ्या व जल्लोष करणाऱ्यांचा देशात अगरबत्ती व धूप लावून यथोचित सत्कार केला पाहिजे,’’ असा टोलाही वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांवर लगावला.
‘‘ ओबीसी समाजाला योग्य आरक्षण देण्यासाठी जातीनिहाय जनगणनेचा तेलंगण पॅटर्न महाराष्ट्राने लागू करावा,’’ अशी मागणी अनिल जयहिंद यांनी केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.