पुणे, ता. १६ : राज्य सरकारच्या परवानगीशिवाय प्राध्यापक पदभरती, पदोन्नती आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या उच्चशिक्षण सहसंचालकांची गुन्हे अन्वेषण विभाग आणि विशेष तपास पथकामार्फत चौकशी करण्यात यावी, संबंधित सहसंचालकांची पदावरून हकालपट्टी करावी, अशा मागणीसाठी महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने उच्च शिक्षण संचालनालयासमोर आंदोलन केले.
राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्यात सुरू असलेल्या दोन हजार ८८ सहाय्यक प्राध्यापकांच्या पदभरतीत आणि उच्च शिक्षण सहसंचालकांनी प्राध्यापक भरतीत भ्रष्टाचार केला आहे. त्याची चौकशी करावी, अशी मागणीचे निवेदन संघटनेचे अध्यक्ष डॉ. संदीप पाथ्रीकर यांनी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांच्याकडे केली आहे. उच्च शिक्षण विभागातील पदभार काढलेल्या आणि बदली केलेल्या अधिकाऱ्यांचा पदभार काढून त्यांची विशेष पथकामार्फत चौकशी करण्यात यावी आणि त्यांचे निलंबन करावे, अशी आग्रही मागणी नवप्राध्यापकांनी लावून धरली.
दरम्यान, ऑक्टोबर २०१७ नंतर रिक्त झालेल्या पदांच्या भरतीला १०० टक्के परवानगी देऊनही मार्च २०२५पर्यंतची सर्व रिक्त पदे तत्काळ भरावी, तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना विद्यापीठ अनुदान आयोगाच्या आदेशानुसार मानधन मिळावे, अशा मागण्यादेखील संघटनेतर्फे निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. ‘‘महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटनेने केलेल्या मागण्याचे निवेदन उचित कार्यवाहीसाठी राज्य सरकारकडे पाठविण्यात येईल,’’ असे उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले.
शिक्षकेतर कर्मचाऱ्याच्या पदभरतीला परवानगी नसताना कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, जळगाव आणि पुणे यांसह अनेक सहसंचालकांनी परस्पर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे भरायला परवानगी दिली आहे. यातून सरकारची फसवणूक केल्यामुळे त्यांची विशेष तपास पथकामार्फत चौकशी करून त्यांना निलंबित करावे.
- डॉ. संदीप पाथ्रीकर, अध्यक्ष, महाराष्ट्र नवप्राध्यापक संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.