पुणे

गणेशोत्सव

CD

लीड-------
गणेशोत्सवातला आनंद आणि उन्माद, उत्साह आणि सवंगपणा यातला फरक कायद्यानं स्पष्ट झाला पाहिजे. सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली अनेक ठिकाणी होत असलेली उत्सवाची विटंबना कायदा करूनच थांबवणं आवश्यक आहे. योग्य ती भूमिका घेऊन राज्योत्सव संहिता जाहीर करण्याची हीच योग्य वेळ आहे. या राज्योत्सवाचं रूप अंतर्बाह्य कसं देखणं मनोहर होईल आणि त्याचा समाजावर कसा संस्कारक्षम प्रभाव पडेल, यासाठी भूमिका राज्य सरकार घेईल, अशी अपेक्षा आहे.

श्रीकांत विष्णू शेटे
अध्यक्ष,
मानाचा पहिला श्री कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट, पुणे

राज्योत्सव संहिता करा जाहीर

‘उत्सवाचं नियोजन’ हा मुद्दा तर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या अगदी सुरुवातीपासूनच कळीचा ठरलेला आहे. याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे, उत्सवाची प्रेरणा आणि उद्दिष्ट सगळ्या प्रमुख धुरीणांना अगदी स्पष्ट होतं. आपण हा उत्सव का करतो आहोत, त्याचं धोरण काय, समाजमन घडवण्याची आपली दिशा कोणती, यावर अतिशय स्पष्ट आणि ठाम भूमिका ठरलेली होती. समाजाचं एकत्र येणं, त्यांना सांस्कृतिक, वैचारिक आणि राष्ट्रीय कर्तव्यांची जाणीव करून देणं, प्रत्येक व्यक्तीमध्ये सक्रियता निर्माण करणं, ही त्या काळातली उद्दिष्टं आजही पूर्णत्वाला गेलेली नाहीत. त्यासाठी नित्यनिरंतर काम करत राहणं किती गरजेचं आहे, हे लोकमान्य टिळक जाणून होते. नुसतंच अचानक ठरलं आणि घरातला गणपती त्यांनी बाहेर आणून सार्वजनिक केला, इतकं हे सगळं सोपं नव्हतं.
सार्वजनिक गणेशोत्सवाची व्यवस्था सक्षम कशी होईल, यावर १३५ वर्षांपूर्वीही विचारविनिमय झालेलाच होता. संपूर्ण गणेशोत्सवात आपल्या एकात्मिक उद्दिष्टांना अनुचित ठरेल असं काहीही घडू नये, यासाठी प्रत्येक जण प्रयत्नशील होता, जागरूक होता. सर्वसामान्य माणूस सार्वजनिक गणेशोत्सवाच्या समर्थनार्थ का उभा राहिला? याचं कारण, त्याची देवावरची निःसंशय श्रद्धा आणि लोकमान्य टिळकांच्या दूरदृष्टीवर असलेला विश्वास..! विविध विषयांवरची अत्यंत उत्तम, प्रेरक आणि उद्‍बोधक व्याख्यानं, राष्ट्रीय भावना प्रज्वलित करणारे मेळे यांनी गणेशोत्सवाची व्यासपीठ हे राष्ट्रीय विचारांचे व्यासपीठ ठरलं. पुढं स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ही समृद्ध परंपरा कला, साहित्य, संगीत, वक्तृत्व, समाजहितार्थ प्रबोधन अशी सुरू राहिली. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजातल्या सात-आठ पिढ्या अभिरुचिसंपन्न आणि उत्तमाच्या सहवासात समृद्ध होत गेल्या. आजही सार्वजनिक गणेशोत्सव हा सृजनाचा उत्सव आहे. आता तर गेल्या काही वर्षांपासून सार्वजनिक गणेशोत्सव आपल्या देशातच नव्हे, तर जगभरात तितक्याच आनंदानं, उत्साहानं साजरा होतोय. आपली पारंपरिक, सांस्कृतिक परंपरा मराठी माणूस परदेशात राहूनही जशीच्या तशी जपतो आहे. कलावंतांनी जीव ओतून घडवलेल्या देवाच्या मूर्तीसमोर हात जोडून, डोळे मिटून आपण उभे राहतो आणि तिच्यामध्ये त्या देवतेचं चैतन्य प्रकट व्हावं, अशी प्रार्थना करतो, तेव्हा आपल्याला नेमका कोणता गणेशोत्सव अभिप्रेत असतो? पारंपरिक संस्कृती आणि सृजनाला आकार देणारा उत्सव की, उत्साहाच्या भरात गोंगाट, कलकलाट, उथळपणा, सवंग मनोरंजन यांच्याकडे झुकलेला उत्सव? सार्वजनिक गणेशोत्सवाच्या या दोन्ही रूपांमधला फरक मी दरवर्षी नुसता पाहत नाही तर प्रत्यक्ष अनुभवतो. पूर्वी गणेशोत्सवात अगदी साधी साधी पण मजा देणारी खेळणी मिळायची. फुगे, पिपाण्या, बांबूच्या छोट्या बासऱ्या, भातुकलीची खेळणी, रंगीत भोवरे, टोप्या अशी नाना तऱ्हेची खेळणी सायकलला लावून विकणारे विक्रेते असत. त्यांच्याकडे मारुतीचा मुखवटा, धनुष्यबाण, गदा वगैरे मिळे. आता रस्तोरस्ती वेगवेगळ्या राक्षसी आणि क्रूर तोंडाचे मुखवटे विकले जातात, अत्यंत कर्कश आवाजाच्या पिपाण्या विकल्या जातात आणि लोकही ते उत्साहात खरेदी करतात, रस्त्यावर फिरताना ती बीभत्स, राक्षसी तोंडं लावून फिरतात. इतकंच नव्हे तर, मिरवणुकीतही असे मुखवटे, कवट्यांची तोंडं लावून नाचतात. एक समाज म्हणून आपल्याला हे खरोखरच अभिप्रेत आहे का? स्पीकरच्या भिंती उभारून त्यावर चित्रविचित्र आणि धार्मिकतेचा अनुचित ठरतील अशी गाणी लावून नाचणं, हा सार्वजनिक उत्सवाचा भाग असावा का? यावर समाजातले अनेक घटक वर्षानुवर्षं टीका करत आहेत, हा उणेपणा काढून टाकण्यासाठी धडपड करत आहेत. आता अपेक्षा आहे ती शासकीय संहितेची आणि तिच्या शिस्तशीर, काटेकोर अंमलबजावणीची..!

राज्योत्सव झाला, पण...
सार्वजनिक गणेशोत्सव हा महाराष्ट्र राज्याचा राज्योत्सव झाला आहे. त्यामुळे, आता त्या उत्सवाचं पावित्र्य, त्यातली सकारात्मकता, त्याची विधायकता याची जबाबदारी कार्यकर्त्यांइतकीच शासनाचीसुद्धा आहे. गणेशोत्सवाला केवळ राज्योत्सव म्हणून जाहीर करून उपयोग होणार नाही. शासनाने गणेशोत्सवाच्या एकूणच स्वरूपाबद्दलची अत्यंत सविस्तर अशी संहिता लागू करणं गरजेचं आहे. त्यासाठी विविध स्तरांवरच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला जायला हवा. नागरिकांकडून सूचना मागवायला हव्यात. यावर्षी राज्योत्सवाचा मान मिळणं आणि याच वर्षी नियोजनाचा, शिस्तीचा, अनुशासनाचा बोजवारा उडणं हा योगायोग निश्चित नाही. दरवर्षीच्या तुलनेत अनेक पटींनी गर्दी वाढणं, सार्वजनिक वाहतूक विस्कळित होणं, सार्वजनिक स्वच्छतागृहांची कमतरता हे प्रश्न तर होतेच. पण, विसर्जन मिरवणुकीत स्पीकरच्या भिंती वाढणं आणि मिरवणुकीची वेळही अनपेक्षितपणे लांबणं हे दोन्ही विषय राज्योत्सवानं आत्मपरीक्षण करावं असेच गंभीर आहेत. हाच का राज्योत्सव? असा प्रश्न जगाला पडावा अशी दृश्यं अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी दिवसभर माध्यमांमधून दिसत होती.

सरकराने भूमिका मांडावी
‘निर्बंधमुक्त उत्सव’ या घोषणेचा समाजाने नेमका काय अर्थ लावला, हे आपल्यापुढे आलेलंच आहे. आता इथून पुढं मात्र यातून योग्य तो बोध घेऊनच राज्योत्सवाची भूमिका जाहीर व्हावी, असं मनापासून वाटतं. परंतु, आता नागरी प्रशासन, पोलिस प्रशासन, कार्यकर्ते आणि समाज असा सुवर्ण चतुष्कोन साधण्यासाठी राज्य शासनाच्या पुढाकाराची गरज आहे. धार्मिकता, राष्ट्रीयत्व, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक उत्तरदायित्व ही श्री कसबा गणपती मंडळाची ओळख पूर्वीही होती, आजही आहे आणि भविष्यातही राहील. यंदाही विसर्जन मिरवणुकीबाबत केवळ प्रशासनच नव्हे, तर संपूर्ण समाजालाच दिलेला शब्द श्री कसबा गणपती मंडळाने व मानाच्या चारीही मंडळांनी पाळला आहे. आता सार्वजनिक गणेशोत्सवातला एक सर्वसाधारण कार्यकर्ता म्हणून आम्हा सर्वांना अशी अपेक्षा आहे की, राज्य सरकारने आपल्या राज्योत्सवासाठीची आपली भूमिका तयार करून समाजापुढं मांडली पाहिजे. या उत्सवाची जगभरातली प्रतिमा अधिकाधिक उज्ज्वल आणि अनुकरणीय कशी होईल, यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

महत्त्वाचे
१) उत्सवातला आनंद आणि उन्माद, उत्साह आणि सवंगपणा यातला फरक कायद्यानं स्पष्ट झाला पाहिजे.
२) सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली अनेक ठिकाणी होत असलेली उत्सवाची विटंबना कायदा करूनच थांबवणे आवश्यक आहे.
३) शिस्त, अनुशासन आणि उत्तरदायित्व यांना पर्याय नसतो, हे कायद्यानंच अधोरेखित व्हायला हवं.
४) केवळ जाणीव जागृती करणं पुरेसं ठरत नाही, तर त्यासाठी कठोर नियमावली लागू करावी लागते, हे सिद्ध करणारी अनेक उदाहरणं देता येतील
५) योग्य ती भूमिका घेऊन राज्योत्सव संहिता जाहीर करण्याची हीच योग्य वेळ
६) या राज्योत्सवाचं रुप अंतर्बाह्य कसं देखणं मनोहर होईल आणि त्याचा समाजावर कसा संस्कारक्षम प्रभाव पडेल, यासाठी भूमिका राज्य शासन घेईल, अशी अपेक्षा.
............

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

Latest Marathi News Updates: गेवराईच्या पूरग्रस्त भागाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT