पुणे, ता. १७ ः पुणे जिल्ह्यात जागतिक दर्जाच्या ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ स्पर्धेचे आयोजन केले असून यातील सुमारे ७५ किलोमीटरचा मार्ग पुणे शहरातून जाणार आहे. त्यासाठी पथ विभागाने १४५ कोटी ७५ लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. पण या निविदेच्या अटीशर्तींवरून आरोप केले जात असताना महापालिका प्रशासनाने आम्हाला नोव्हेंबर अखेरपर्यंत कामे पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे क्षमता असलेल्या ठेकेदारांकडून कामे करून घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
जिल्हा प्रशासन आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफआय) यांच्यातर्फे ‘टूर दी फ्रान्स’ या फ्रान्स येथील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या धर्तीवर पुणे शहर, जिल्ह्यात ‘पुणे ग्रँड चॅलेंज टूर’ ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचा एकूण मार्ग हा ६८४ किलोमीटरचा आहे. त्यापैकी ७४.८० किलोमीटरचा मार्ग पुणे शहराच्या विविध भागातून जात आहे. हे रस्ते चांगले करण्यासाठी पूर्वगणनपत्रक समितीने चार पॅकेजमध्ये १४५ कोटी ७५ लाख रुपयांचे पूर्वगणनपत्रक मंजूर केले आहे. त्याची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे, निविदा भरण्यासाठी केवळ सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. यामध्ये पॅकेज एकसाठी चार, पॅकेज दोनसाठी चार, पॅकेज तीनसाठी सहा आणि पॅकेज चारसाठी सात जणांनी निविदा भरली आहे. त्यांच्या कागदपत्रांची छाननी सुरू असून, अद्याप ‘ब’ पाकीट उघडलेले नाही.
या निविदा प्रक्रियेवर आपला परिसर संस्थेने आक्षेप नोंदविला आहे. पुणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात रस्त्यांची देखभाल दुरुस्ती, रंगकाम, खड्डे बुजविणे, रिसर्फेसिंग यासह अन्य कामांसाठी सुमारे ४० कोटींची तरतूद आहे. तसेच आता सायक स्पर्धेच्या निमित्ताने केल्या जाणारा खर्च हा प्रति किलोमीटरचा खर्च जास्त आहे. या कामाचे पूर्वगणनपत्रक फुगविण्यात आले आहे. त्यामुळे याचा फेरविचार करावा, अशी मागणी आपला परिसरचे उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी, प्रशांत बधे यांनी आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे.
या स्पर्धेसाठी जागतिक स्तरावरील सायकलपट्टू येणार आहे. त्यामुळे कामाच्या दर्जाबाबत तडजोड केली जाणार नाही. महापालिकेच्या अर्थसंकल्पात देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी तरतूद आहे. पण या छोट्या रकमांच्या अनेक निविदांमुळे कामावर नियंत्रण राहणार नाही. पुढच्या दोन महिन्यांत अतिशय दर्जेदार रस्ते तयार करायचे आहेत. त्यामुळे ज्यांची आर्थिक क्षमता व उत्तम काम करण्याचा अनुभव आहे असे ठेकेदार असणे आवश्यक आहे. या कामाचा खर्च फुगविण्यात आलेला नाही.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पथ विभाग, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.