पुणे, ता. १८ : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्यामुळे पुणे रेल्वे स्थानक परिसरात पहाटे प्रवाशाला मारहाण करून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा चोरट्यांना बंडगार्डन पोलिसांनी अटक केली.
महेश अंबादासजी फोटजावरे (वय १९) आणि प्रसाद दत्तू कांबळे (वय २७, दोघे रा. पुणे स्टेशन परिसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ९ सप्टेंबर रोजी पहाटे रेल्वे स्थानकावरील एक क्रमांकाच्या फलाटावर थांबले होते. त्यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी फिर्यादीकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांनी नकार दिल्यावर तिघांनी शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर शस्त्राने पोटावर आणि हातावर वार करून जखमी केले. याबाबत तक्रारीवरून बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी १६ सप्टेंबर रोजी रात्री दोघांना अटक केली. त्यांना पुढील तपासासाठी लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
ही कारवाई परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहाय्यक आयुक्त संगीता शिंदे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) निळकंठ जगताप आणि संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, प्रदीप शितोळे, सारस साळवी, महेश जाधव, पोलिस अंमलदार ज्ञानेश्वर बडे, मनीष संकपाळ, मनोज भोकरे, शिवाजी सरक आदींचा समावेश होता.
-------