पुणे, ता. १८ : शहर आणि उपनगर परिसरात बुधवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने गुरुवारी (ता. १८) जोरदार हजेरी लावली. मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह दुपारी साडेतीन ते सायंकाळी साडेपाचदरम्यान पडलेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच दाणादाण उडाली. पुढील दोन दिवसदेखील पावसाचा जोर कायम राहणार असल्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
शहरात सकाळपासून लख्ख सूर्यप्रकाश होता. मात्र, दुपारी तीन वाजताच्या सुमारास अंधारून आले. जोरात वारे वाहू लागले आणि पावसाला सुरुवात झाली. सुरुवातीला पावसाचा जोर कमी होता. मात्र, हळूहळू तो वाढत गेला. शेवटी तर इतका वाढला की, रस्त्यांना तळ्यांचे स्वरूप आले. सुमारे दोन तासांहून अधिक वेळ सुरू असलेल्या पावसाने सखल भागांतील रस्ते पाण्याखाली गेले. रस्त्यांना नद्या- नाल्यांचे स्वरूप प्राप्त झाले होते. रस्त्यावर साठलेल्या पाण्यामुळे वाहतुकीचा वेग मंदावला. त्यामुळे मध्य भागातील प्रमुख रस्त्यांवर ठिकाठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली. शहर, उपनगर आणि ग्रामीण भागामध्येही पावसाचा जोर कायम होता. दरम्यान, या पावसामुळे विमानसेवेवर कोणताही परिणाम झाला नाही. एकही उड्डाण रद्द करावे लागले नाही किंवा विमानसेवा वळवावी लागली नाही, अशी माहिती विमानतळ संचालक संतोष ढोके यांनी दिली.
शहरात मेट्रोची, उड्डाण पुलांची कामे सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली. शिवाजीनगर, एरंडवणा, सिंहगड रस्ता, सेनापती बापट रस्ता, बाणेर- बालेवाडी, सातारा रस्ता, स्वारगेट, कात्रज, लष्कर परिसर, मुंढवा, कोरेगाव पार्क, लोहगाव, विमाननगर, नऱ्हे अशा सर्वच परिसरांत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे शहरातील मध्यवर्ती भागासह कात्रज-कोंढवा रस्ता, नगर रस्ता, सिंहगड रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र होते. या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत होती.
शहर व परिसरातील सहा सोसायट्यांमध्ये पाणी साचल्याच्या तक्रारी अग्निशमन दलाकडे रात्री आठपर्यंत आल्या होत्या. शिवाजीनगर, औंध, आंबेगाव, सिंहगड रस्ता, वडगाव, नांदेड आणि नऱ्हे आदी भागांत पाणी साचल्याची माहिती मिळाल्यावर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी पोचून नागरिकांना दिलासा दिला. दरम्यान, मुसळधार पावसामुळे शहरातील काही भागांचा वीजपुरवठाही खंडित झाला होता.
---------------
पाषाण परिसरात सर्वाधिक पावसाची नोंद
शहरात दोन तास झालेल्या पावसामुळे पाषाण परिसरात ७१.८ मिलिमीटर सर्वाधिक, तर शिवाजीनगर ३६.२, माळीण १७.५, हवेली १७, हडपसर १४, लवळे ६.५, तसेच राजगुरुनगर येथे १.५ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.
------------
पुण्यातील विविध भागांत पावसाने दाणादाण...
- भोसलेनगर येथे पावसामुळे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले, त्यामुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली.
- अशोकनगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांना वाट काढणे कठीण झाले.
- गणेशखिंड रस्त्यावर पाण्याच्या प्रवाहामुळे बाजूला ठेवलेले बॅरिकेड्स वाहून गेले.
- रेंजहिल्स कॉर्नर ते शिवाजीनगर यादरम्यानच्या रस्त्यांवर पाण्याचे लोट वाहत होते.
- अपुऱ्या बसथांब्यांमुळे गणेशखिंड बसथांबा येथे विद्यार्थ्यांना भर पावसात रस्त्यावरच बसची वाट पाहावी लागली.
- कोथरूड येथील पुष्पक हॉटेलसमोर रस्त्यावर पाणी साचले होते.
- सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी प्रवेशद्वार, अग्निशमन केंद्र परिसर जलमय.
- धायरी गावात नदीचे स्वरूप.
- नऱ्हे येथे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचले होते.
------------------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.