पुणे, ता. १९ : वनस्पतीशास्त्रातील चालता बोलता ‘ज्ञानकोश’ अशी ओळख असणाऱ्या ज्येष्ठ वनस्पतितज्ज्ञ डॉ. हेमा साने (वय ८५) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. पर्यावरणाचा अभ्यास करायचा म्हणजे खऱ्या अर्थाने निसर्गाशी एकरूप होऊन राहायला हवं, म्हणून डॉ. साने यांनी तशीच जीवनशैली आयुष्यभर अंगीकारली. विजेशिवाय आपण राहू शकतो, हे त्यांनी स्वतःच्या जगण्यातून दाखवून दिले.
बुधवार पेठेतील तांबडी जोगेश्वरी मंदिराजवळील शीतलादेवी पार भागातील जुनाट आणि पडक्या वाड्यात डॉ. साने राहत होत्या. त्यांचे वृद्धापकाळाने राहत्या घरी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर रविवारी (ता. २१) वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉ. साने यांचा जन्म १३ मार्च १९४० रोजी झाला. त्यांनी वनस्पतीशास्त्र विषयात एम.एस्सी आणि पीएच.डी संपादन केली. पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून डॉ. साने या वनस्पतीशास्त्र विभागाच्या प्रमुख म्हणून सेवानिवृत्त झाल्या. गेल्या सहा दशकाहून अधिक काळ त्यांनी घरामध्ये विजेचा वापरच केला नाही. निसर्गाशी जुळवून घेऊन पक्षी आणि प्राण्यांसमवेत जीवन जगण्याचा आनंद त्यांनी आयुष्यभर लुटला. पुण्यातील एक अस्सल निसर्गप्रेमी व्यक्तिमत्त्व अशी त्यांची ओळख होती.
डॉ. साने या निसर्गप्रेमी असूनही त्यांनी इतिहासाचादेखील अभ्यास केला. नोकरीतील शेवटची दहा वर्षे त्यांनी दुचाकी वापरली. तोपर्यंत आणि त्यानंतर त्या नोकरीव्यतिरिक्त इतरत्र पायीच जात. केवळ दिवसाच्या प्रकाशात आणि रात्री कंदिलाच्या प्रकाशात त्यांनी वनस्पतीशास्त्र आणि पर्यावरण विषयांसह इतिहास, प्राच्यविद्या अशा विषयांवर जवळपास ३० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत.
‘आपले हिरवे मित्र’, ‘बुद्ध परंपरा आणि बोधीवृक्ष’, ‘पुणे परिसरातील दुर्मीळ वृक्ष’ (सहलेखिका- डॉ. विनया घाटे), ‘बायोलॉजी’ (सहलेखिका- वीणा अरबाट), इंडस्ट्रिअल बॉटनी’ (सहलेखिका- डॉ. सविता रहांगदळे) अशी त्यांची काही गाजलेली पुस्तके आहेत. निसर्ग संवर्धन क्षेत्रातील विविध नामांकित संस्थांकडून त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविले आहे. वनस्पतीशास्त्राच्या अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी पीएच.डीसाठी मार्गदर्शन केले आहे.