पुणे, ता. २० : संकटकाळी जिवाची पर्वा न करता इतरांचे प्राण वाचविण्याची शर्थ करणाऱ्या आणि माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या व्यक्तींचा ‘सकाळ’तर्फे शनिवारी सन्मान करण्यात आला, तसेच लेखणीच्या माध्यमातून विघातक प्रवृत्तींवर प्रहार करणाऱ्या बातमीदारांचाही ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कारा’ने गौरव करण्यात आला.
निमित्त होते, ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या १२८व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाचे. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व राष्ट्रीय तपासयंत्रणेचे महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते पुरस्कार व सन्मान प्रदान करण्यात आले. ‘सकाळ’चे मुख्य संपादक सम्राट फडणीस यांनी पुरस्कारामागील भूमिका स्पष्ट केली.
शेततळ्यात मुले बुडताना दिसताच जिवाची पर्वा न करता थेट तळ्यात उडी मारून त्यांना वाचवणारे सूरज मचाले, भररस्त्यात वाहतूक नियंत्रण करताना ‘पीएमपी’च्या बसचालकाला हृदयविकाराचा झटका आल्याचे लक्षात येतात क्षणाचाही विलंब न करता त्याला ‘सीपीआर’ देणारे आणि वैद्यकीय मदत करणारे पोलिस कर्मचारी रोमेश ढावरे व अर्चना निमगिरे आणि आपल्या कुटुंबातील विवाहाचा स्वागत समारंभ तात्पुरता थांबवून दुसऱ्या कुटुंबातील मुलीचा विवाह सोहळा तितक्याच जल्लोषात करणारे फारुख काझी यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. आपल्या कार्यातून सकारात्मकतेची पणती तेवत ठेवणाऱ्या या व्यक्तींना पुणेकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
जनतेच्या प्रश्नांना लेखणीच्या माध्यमातून वाचा फोडणाऱ्या ‘सकाळ माध्यम समूहा’तील बातमीदारांना दरवर्षी ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कारा’ने गौरवण्यात येते. स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार (कै) ना. अ. पेंडसे यांनी दिलेल्या निधीतून हा पुरस्कार देण्यात येतो. यंदा छत्रपती संभाजीनगरमधील ‘सकाळ’चे प्रिन्सिपल कॉरस्पाँडन्ट माधव इतबारे, ‘कोल्हापूर सकाळ’चे वरिष्ठ बातमीदार संतोष मिठारी, सातारा ‘सकाळ’चे उपसंपादक स्वप्नील शिंदे आणि गडचिरोली ‘सकाळ’चे जिल्हा बातमीदार मिलिंद उमरे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.