पुणे, ता. २१ : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील श्री तांबडी जोगेश्वरी, श्री चतु:शृंगी, श्री भवानी माता आणि सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात सोमवार (ता. २२) पासून दोन ऑक्टोबरपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी केले आहे.
श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर परिसर :
- अप्पा बळवंत चौक ते बुधवार चौक (हुतात्मा चौक) हा रस्ता वाहतुकीस बंद असेल.
- पर्यायी मार्ग : बुधवार चौक ते अप्पा बळवंत चौक हा रस्ता एकेरी वाहतुकीसाठी खुला राहील.
- लक्ष्मी रस्त्यावरील गणपती चौक ते तांबडी जोगेश्वरी मंदिर हा मार्ग बंद राहील.
- ‘सकाळ’ कार्यालयाकडून तांबडी जोगेश्वरी मंदिराकडे जाणारा रस्ता अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी खुला असून इतर वाहनांना बंदी असेल.
पर्यायी मार्ग : लक्ष्मी रस्त्याने गणपती चौकात येऊन जोगेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी सेवासदन चौकातून उजवीकडे वळून बाजीराव रस्त्याने सरळ शनिवारवाडामार्गे इच्छितस्थळी जावे.
- मंदिर परिसरात आणि शनिवार पेठेतील श्री अष्टभुजा मंदिराजवळ वाहने लावण्यासाठी मनाई आहे. भाविकांनी आपली वाहने नदीपात्रातील रस्ता व मंडई वाहनतळ येथे उभी करावीत.
श्री चतु:शृंगी मंदिर परिसर :
सेनापती बापट रस्त्यावर चतु:शृंगी मंदिर परिसरातील वाहतूक वेताळबाबा चौक- दीप बंगला चौक- ओम सुपर मार्केटमार्गे वळविण्यात येईल.
श्री भवानी माता मंदिर परिसर (भवानी पेठ) :
भवानी माता मंदिरासमोरील महात्मा फुले रस्ता वाहतुकीस बंद राहील. या परिसरात वाहने लावण्यास मनाई असेल. वाहनचालकांनी पंडित नेहरू रस्ता आणि इतर रस्त्यांवरील पार्किंग झोनमध्ये वाहने उभी करावीत.
श्रीसुक्त पठणानिमित्त वाहतूक बदल :
श्रीसुक्त पठणानिमित्त मंगळवारी (ता. २३) पहाटे पाच ते सकाळी सातदरम्यान सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात वाहतूक बदल करण्यात येणार आहे. स्वारगेटकडून जेधे चौकातून सारसबागमार्गे स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्याकडे जाणारा रस्ता वाहतुकीस बंद राहील. मित्रमंडळ चौकाकडून पूरम चौकाकडे येणारा मार्ग वाहतुकीस बंद राहील.
मित्रमंडळ चौकातून येणाऱ्या वाहनांनी सावरकर चौकातून सिंहगड रस्तामार्गे जावे. सिंहगड रस्त्याने सावरकर चौकात येणाऱ्या वाहनचालकांनी लक्ष्मीनारायण चौकातून इच्छितस्थळी जावे, असे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.