पुणे, ता. २१ ः अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या मुहूर्तावर सोमवारपासून (ता. २२) शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. घटस्थापनेने नवरात्राच्या मंगल पर्वाला प्रारंभ होणार असून सर्वत्र आदिशक्तीचा जागर होणार आहे. सोमवारी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे साडेचारपासून दुपारी दोनपर्यंत घटस्थापनेसाठी मुहूर्त आहे. यावर्षी तृतीया तिथीची वृद्धी झाल्याने नवरात्र दहा दिवसांचे आहे.
नवरात्रोत्सवातील ललिता पंचमी शुक्रवारी (ता. २६) असून पुढील सोमवारी (ता. २९) घागरी फुंकून महालक्ष्मी पूजन करायचे आहे. दुर्गाष्टमी, श्रीसरस्वती पूजन आणि महाष्टमी उपवास मंगळवारी (ता. ३०) असून महानवमी व नवरात्रोत्थापन बुधवारी (ता. १) आणि विजयादशमी म्हणजेच दसरा गुरुवारी (ता. २) आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक लोक आपल्या नवीन उपक्रमाचा आरंभ करतात. हा विजय मुहूर्त यंदा दुपारी २ वाजून २७ मिनिटे ते ३ वाजून १५ मिनिटे या वेळेत आहे, अशी माहिती ‘दाते पंचांगकर्ते’ मोहन दाते यांनी दिली.
शारदीय नवरात्रोत्सवासाठी शहरातील देवीच्या मंदिरांमध्ये तयारीला वेग आला आहे. उत्सवातील दहाही दिवस मंदिराच्या परिसरात विविध धार्मिक उपक्रमांसह सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी उत्सव मंडप उभे करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांमध्ये वेदपठण, ब्रह्मसूक्त-देवीसूक्त पठण, भजन- कीर्तन, प्रवचने, भोंडला, विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान, कन्यापूजन आदी कार्यक्रमांचा समावेश आहे. भाविकांसाठी अभिषेक आणि आरतीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली असून, भाविकांच्या सुरक्षेसाठी मंदिर प्रशासनाने तयारी केली आहे. सोमवारी घटस्थापना झाल्यानंतर मंदिरे भाविकांच्या दर्शनासाठी खुली राहणार आहेत.
ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर, भवानी पेठ येथील भवानी माता मंदिर, श्री काळी जोगेश्वरी मंदिर, श्री चतुःशृंगी मंदिर, श्री महालक्ष्मी मंदिर, तळजाई टेकडीवरील तळजाई माता देवस्थान आदी मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची तयारी करण्यात आली आहे. रंगरंगोटी आणि विद्युत रोषणाईने या मंदिरांची सजावट करण्यात आली आहे.
खरेदीसाठी गर्दी
शारदीय नवरात्रोत्सवात घरोघरी घटस्थापना केली जाते. त्याच्या तयारीलाही वेग आला आहे. रविवारी सुटी असल्याने उत्सवासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याच्या खरेदीसाठी बाजारपेठेत नागरिकांची गर्दी झाली होती. घट, परडी, माती, सप्तधान्ये, पूजेचे साहित्य आदी साहित्याची खरेदी केली जात होती. तसेच, पूजेसाठी आवश्यक असणाऱ्या फुलांनाही मोठी मागणी होती.
प्रमुख मंदिरांमधील घटस्थापना
१) ग्रामदेवता श्री तांबडी जोगेश्वरी मंदिर
श्री तांबडी जोगेश्वरी मंदिरात पहाटे ५.३० वाजता रोहित बेंद्रे यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. त्यानंतर मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत खुले राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिरात विशेष सजावट करण्यात येणार असून, दररोज देवी विविध रूपांमध्ये आणि विविध वाहनांवर आरूढ असेल.
२) श्री चतुःश्रुंगी मंदिर
चतुःश्रुंगी मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पद्धतीने नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. मंदिरात सोमवारी (ता. २२) सकाळी ८.३० वाजता घटस्थापना होणार आहे त्यापुढील नऊ दिवस मंदिरामध्ये विविध धार्मिक व पारंपरिक कार्यक्रम होणार आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही मंदिर परिसरात पारंपरिक यात्रा भरणार आहे.
३) श्री महालक्ष्मी मंदिर
सारसबागेतील श्री महालक्ष्मी मंदिरात सकाळी ९ वाजता गोपालराजे पटवर्धन आणि पद्माराजे पटवर्धन यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे. सायंकाळी ६ वाजता मंदिरावरील विद्युत रोषणाईचे उद्घाटन पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते होईल. मंगळवारी (ता. २३) पहाटे ५ वाजता मंदिरातर्फे आणि सकाळ माध्यम समूहातर्फे
सामूहिक श्रीसूक्त पठण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
४) श्री भवानी देवी मंदिर
भवानी पेठेतील श्री भवानी देवी मंदिरात सकाळी ६ वाजता महारुद्राभिषेक आणि महापूजा होणार आहे. त्यानंतर तुकाराम दैठणकर यांचे सनईवादन होणार असून सकाळी ११ वाजता घटस्थापना होणार आहे. उत्सवकाळात दररोज ललिता सहस्रनाम पठण, श्रीसूक्त पठण होणार असून, दिवसभर विविध भजनी मंडळे भजनसेवा रुजू करतील.