पुणे, ता. २३ : आजारपण आणि मृत्यूच्या दारातून परतलेल्या माणसाला जीवनाचा एक वेगळाच अर्थ गवसतो. ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ विजय ठोंबरे यांना आलेला असाच विलक्षण अनुभव ‘हीलिंग एक्स्प्रेशन्स’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमातून रसिकांपर्यंत पोहोचणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवारी (ता. २६) कोथरूडमधील मयूर कॉलनी, बालशिक्षण मंदिर सभागृहात सायंकाळी सहा वाजता होणार आहे.
गंभीर आजारामुळे व्यक्तीमध्ये मोठे परिवर्तन होते आणि त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. ठोंबरे यांच्या बाबतीतही असेच घडले. त्यांच्या आजारावरील उपचारांचा प्रवास हा त्यांच्यासाठी एक सर्जनशील नवनिर्मितीची प्रक्रिया ठरली. त्यामुळेच त्यांनी या कार्यक्रमाला ‘उपचारप्रवासाची अभिव्यक्ती’ म्हणजेच ‘हीलिंग एक्स्प्रेशन्स’ असे नाव दिले आहे.
ठोंबरे म्हणाले, ‘‘माझ्या उपचारांच्या प्रवासात प्रेमळ कुटुंबीय, आधुनिक वैद्यकशास्त्र, फिजिओथेरपी, प्रार्थना, संगीत आणि योगासारख्या अनेक घटकांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रवासात जे माझे सहप्रवासी होते, त्या सर्वांचा सहभाग या कार्यक्रमात असेल.’’
यावेळी ठोंबरे यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि संगीतोपचारतज्ज्ञ आसावरी ठोंबरे, मुलगा अनीश, गायिका डॉ. गौरी करंबेळकर, योग व आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. उल्का फडके, माध्यमतज्ज्ञ डॉ. गिरीश रांगणेकर आणि न्यूरो फिजिओथेरपिस्ट मधुरा जोशी तसेच उपचार करणारे वैद्यकीय तज्ज्ञ व फिजिओथेरपिस्ट उपस्थित असणार आहेत.