पुणे, ता. २३ ः नवरात्रोत्सवाचे मंगलमय वातावरण अन् विद्युत रोषणाईने उजळलेल्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात मंगळवारी पहाटे श्रीसूक्त पठणाच्या सुरांनी प्रसन्नतेची अनुभूती आली. पावसाच्या हलक्या सरी बरसत असतानाही महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सामुदायिक श्रीसूक्त पठण उपक्रमात सहभाग घेतला आणि आदिमायेला नमन केले.
सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिर, सकाळ माध्यम समूह आणि विश्वकर्मा विद्यापीठातर्फे शारदीय नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या माळेनिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंदिराच्या विश्वस्त डॉ. तृप्ती अग्रवाल, भरत अग्रवाल, ॲड. प्रताप परदेशी, प्रवीण चोरबेले, हेमंत अर्नाळकर, ‘सकाळ’च्या वितरण विभागाचे वरिष्ठ व्यवस्थापक गिरीश टोकशिया आदी उपस्थित होते. ट्रस्टचे प्रमुख संस्थापक-विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल यांचे मार्गदर्शन उपक्रमाला होते.
या उपक्रमासाठी पहाटे चार-साडेचारपासूनच मंदिरासमोर महिलांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती. सोमवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली असली; तरी महिलांच्या उत्साहावर त्याचा परिणाम झाला नव्हता. मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली होती. नवरात्रोत्सवात नऊ दिवस नऊ विविध रंगांची वस्त्रे परिधान केली जातात. त्यात मंगळवारी लाल रंग असल्याने त्याच रंगाची पारंपरिक वस्त्रे परिधान केलेल्या महिलांनी मंदिराचा परिसर फुलला होता.
भक्तिमय वातावरण
- ध्यानधारणा आणि ॐकाराने कार्यक्रमाला प्रारंभ
- ध्यानाने चित्त शांत आणि एकाग्र झाल्यानंतर केशव शंखनाद पथकाने केलेल्या शंखनादाने वातावरण प्रफुल्लित
- त्यानंतर अथर्वशीर्षाचे पठण व त्यानंतर श्रीसूक्ताची तीन आवर्तने आणि फलश्रुतिचे पठण
- आरतीने उपक्रमाची सांगता
- शंखनाद आणि मंत्रोच्चाराने परिसरात भारावलेले वातावरण
- विश्वकर्मा विद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या ढोल व लेझीम पथकाच्या वादनाने चैतन्य निर्माण
धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा, समाजातील सर्व घटकांना सामावून घेणारा ‘सार्वजनिक नवरात्रोत्सव’ महालक्ष्मी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही साजरा होत आहे. सामुदायिक श्रीसूक्त पठणाच्या माध्यमातून महिला शक्तीने एकत्र येऊन स्त्री शक्तीचा जागर करावा, हा उद्देश दरवर्षी असतो.
- डॉ. तृप्ती अग्रवाल, विश्वस्त, श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग