पुणे, ता. २८ : शहरी गरीब आणि अंशदायी वैद्यकीय साहाय्य (सीएचएस) या आरोग्य योजनांमुळे दीड वर्षात २६ हजार नागरिकांना उपचार मिळाले आहेत. महापालिकेने यासाठी १६८ कोटी रुपये खर्च केले असून, प्रत्येक लाभार्थ्यावर सरासरी ६४ हजार ६१५ रुपये खर्च झाला. या योजनांमुळे सर्वसामान्य गरीब कुटुंबांना मोठा दिलासा मिळत असून, ही बाब आरोग्यदायी दृष्टिकोनातून सकारात्मक मानली जात आहे.
महापालिकेने ‘सीएचएस’ योजना १९६७ मध्ये सुरू केली तर शहरी गरीब योजना २०११ ला सुरू झाली. अलीकडे या योजनांमध्ये लाभार्थ्यांची संख्या वाढत असल्याने दरवर्षी या योजनेचा खर्चही वाढत आहे. दरवर्षी या योजनेवर सरासरी १०० कोटी रुपयांचा खर्च होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या सहा महिन्यांत रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.
खासगी रुग्णालयांमधील उपचारांचे दर गगनाला भिडलेले आहेत. ते सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहिलेले नाहीत. दरवर्षी वैद्यकीय महागाई (मेडिकल इन्फलेशन) १५ ते १८ टक्क्यांनी वाढत आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च सर्वसामान्यांना खिशातून करावा लागतो. त्यामध्ये शहरी-गरीब योजनेचा लाभ हा सर्वसामान्यांना काहीसा दिलासा मिळतो. म्हणून योजनेत दरवर्षी लाभार्थी संख्या वाढत असल्याने आरोग्य विभागाला पुरवणी खर्चाद्वारे तो भागवावा लागतो. या योजनेद्वारे गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना शस्त्रक्रिया, तपासण्या, औषधे आणि आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध होत आहेत.
शहरी-गरीब योजनेविषयी...
- पुणे शहरातील रहिवासी पुरावा असलेल्या व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंब ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाखांच्या आत आहे त्यांना तसेच पिवळे रेशनकार्डधारकांना या योजनेचा लाभ मिळतो.
- या योजनेंतर्गत संलग्न खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या पात्र रुग्णांना आलेल्या वैद्यकीय बिलाच्या निम्मी रक्कम महापालिकेकडून मिळते.
- या रकमेची मर्यादा जास्तीत जास्त एक लाख ६० हजार आहे
- मूत्रपिंड (किडनी), हृदयविकार व कर्करोग या दीर्घकालीन आजारांच्या उपचारांसाठी वर्षाला दोन लाख रुपयांपर्यंतच आर्थिक मदत मिळते.
‘सीएचएस’ योजना?
- पुणे महापालिकेच्या कर्मचारी, अधिकारी, नगरसेवक (सेवेत असलेले व सेवानिवृत्त) आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी वैद्यकीय सुविधा देणारी ही योजना आहे.
- या योजनेंतर्गत आलेल्या एकूण वैद्यकीय खर्चापैकी ९० टक्के खर्च महापालिकेकडून दिला जातो तर १० टक्के खर्च संबंधित कर्मचारी किंवा अधिकारी यांना भरावा लागतो.
- नगरसेवकांना १०० टक्के परतावा दिला जातो. याअंतर्गत शहरातील महत्त्वाचे खासगी रुग्णालये संलग्न आहेत.
शहरी गरीब व ‘सीएचएस’ योजनांचे लाभार्थी व झालेला खर्च
(स्रोत : पुणे महापालिका आरोग्य विभाग)
एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ एप्रिल २०२५ ते ११ सप्टेंबर २०२५
मंजूर अर्ज : १३०१९ १२,९९२
नाकारलेले अर्ज : २५ २५
शहरी-गरीब योजनेचा खर्च झालेला निधी : ५४ कोटी २० कोटी ५९ लाख
‘सीएचएस’ योजनेचा खर्च झालेला निधी : ६८ कोटी २६ कोटी ७ लाख
नागरिकांना आता घरबसल्या नोंदणी करणे शक्य होत असल्याने कागदपत्रांची पडताळणी जलद आणि सोपी झाली आहे. जास्तीत जास्त पात्र लाभार्थींना योजनांचा लाभ मिळावा, यासाठी आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे.
- डॉ. संजीव वावरे,
सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.