पुणे, ता. २८ : ‘आशिया कप २०२५’मधील भारत-पाकिस्तान अंतिम सामन्यात भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा पुणेकरांनी मध्यरात्री जल्लोष साजरा केला. सामना संपताच शहरातील मुख्य रस्त्यांवरून तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहताना दिसला. तिरंगा हातात घेऊन, टीम इंडियाची जर्सी परिधान करून तरुण-तरुणी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम, ‘जितेगा भाई जितेगा...इंडिया जितेगा’ अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले.
शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्येही उत्स्फूर्त जल्लोष झाला. ठिकठिकाणी रंगीबेरंगी फटाक्यांची आतषबाजी झाली, मिठाईचे वाटप करण्यात आले. काही ठिकाणी तरुणांनी दुचाकींच्या ताफ्यासह रॅली काढून संपूर्ण शहर दणाणून सोडले. सामना सुरू असताना मात्र पुणेकरांमध्ये तणाव व निराशेचे वातावरण होते. अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव बाद झाल्यानंतर पाकिस्तान सामन्यावर नियंत्रण मिळवेल, अशी भीती होती. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पसरला होता. परंतु अखेरच्या काही षटकांमध्ये शिवम दुबे आणि तिलक वर्माने चौकार-षटकारांची आतषबाजी करत पुणेकरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. प्रत्येक फटक्यानंतर हॉटेल्स, मैदानं, चौक आणि गल्ल्यांमध्ये टाळ्या-घोषणांचा गजर होत होता. शिवम दुबे बाद झाल्यावर क्षणभर काळजी वाढली, मात्र अखेरीस टीम इंडियाने पाच गडी राखत विजयाची नोंद केली आणि आनंदोत्सवाला सुरुवात झाली.
सामना पाहण्यासाठी दिवसभर पुणेकरांमध्ये उत्सुकता होती. अनेक हॉटेल्स, सोसायट्या व सार्वजनिक ठिकाणी मोठे पडदे लावून थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले होते. कुटुंबांसह क्रिकेटप्रेमींनी सामन्याचा आनंद घेतला. सामना जिंकताच नागरिक रस्त्यावर उतरले आणि फटाक्यांच्या रोषणाईत शहर उजळून निघाले. या विजयामुळे पुण्यात रविवारी उशिरा रात्री जणू दिवाळीच अवतरल्याचा भास निर्माण झाला. क्रिकेटप्रेमींनी ‘भारत माता की जय’च्या गजरात एकमेकांना मिठ्या मारल्या, शुभेच्छा दिल्या आणि आनंदोत्सवात सहभागी होत भारताच्या ऐतिहासिक विजयाला सलाम केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.