पुणे, ता. ३ : शहरात एकाच दिवशी चार थरारक घटना...दुपारी डेक्कन आणि एमजी रस्त्यावर ‘बॉम्बस्फोट’, सायंकाळी विश्रांतवाडीत दहशतवादी हल्ला, तर विमान अपहरणाची माहिती शहरभर पसरली... काही क्षणांतच रुग्णवाहिका, कमांडो, बॉम्बनाशक पथके आणि पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. नागरिकांची धडधड वाढली; पण अखेर हा सर्व थरार सराव (मॉक ड्रील) असल्याचे जाहीर होताच नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
शुक्रवारी (ता. ३) दुपारचे दीड वाजलेले...डेक्कन परिसरातील गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन रस्ता) आणि कॅम्पमधील महात्मा गांधी (एमजी) रस्त्यावर अचानक बॉम्बस्फोट झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. सायंकाळी चार वाजता विश्रांतवाडीतील संशोधन व विकास संस्थेत दहशतवादी हल्ल्याची बातमी धडकली. तर अन्य एका घटनेत दहशतवाद्यांनी विमानाचे अपहरण केले असून, प्रवाशांना ओलिस ठेवलेले हे विमान सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पुणे विमानतळावर उतरणार आहे, दहशतवाद्यांशी बोलणी सुरू आहे, अशी परिस्थिती होती. या सर्व वर्दळीच्या आणि संवेदनशील ठिकाणी काही क्षणांतच रुग्णवाहिका, बॉम्बशोधक व नाशक पथकांसह शस्त्रसज्ज पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. विशेष म्हणजे संशोधन व विकास संस्था आणि विमानतळावर फोर्स वन आणि एनएसजी अशा कमांडोनीही सहभाग घेतला. अखेर ‘‘हे ‘मॉक ड्रील’ असून, आपत्कालीन प्रसंगी पोलिस, कमांडो, रुग्णवाहिका, बॉम्बनाशक पथक, वाहतूक यंत्रणा यांच्यातील समन्वय आणि तत्परता यांची चाचपणी घेण्यात आली,’’ असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले.
एकाच वेळी काही ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पोलिस आणि इतर सुरक्षा यंत्रणांमध्ये किती समन्वय आहे, यंत्रणा किती अलर्ट आहेत, याची चाचपणी घेण्यात आली. गृह विभागासह पुणे पोलिस, बीडीडीएस, अग्निशामक दल, फोर्स वन आणि एनसजी कमांडोंकडून एकत्रित मोहीम राबविण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टीने आपत्कालीन परिस्थितीत नेमकी कोणती पावले उचलायची, हे तपासण्यासाठी हा ‘मॉक ड्रील’चा सराव होता. नागरिकांनी भीती बाळगू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त
ऐनवेळी सूचना, कोंडीमुळे नागरिक संतप्त
पोलिसांनी वाहतूक बदलाबाबत नागरिकांना किमान दोन दिवस पूर्वसूचना देणे अपेक्षित असते. मात्र, आदल्या दिवशी रात्री प्रसारमाध्यमांना गरवारे पुलाच्या दुरुस्तीसाठी वाहतूक बदलाची माहिती देण्यात आली. प्रत्यक्षात दुरुस्तीचे काम नव्हते. याबाबत महापालिका प्रशासनही अनभिज्ञ होते. वाहतूक कोंडीत अडकलेल्या नागरिकांनी संताप व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.