पुणे, ता. ५ : दिवाळी जवळ आल्याने शहरात सणासुदीचा उत्साह वाढू लागला आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने पुणे शहरातील, तसेच उपनगरांतील प्रमुख बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. वस्त्र, दागिने आणि गृहसजावटीच्या वस्तू खरेदीसाठी दुकाने फुलून गेली आहेत.
लक्ष्मी, टिळक, जंगली महाराज, एम. जी. रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले पथावर (एफसी) खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे. त्यासह तुळशीबाग, मंडई, मनीष मार्केट, खडकी स्थानक आणि कॅम्प यासह उपनगरांतील बाजारपेठांत नागरिकांनी खरेदी केली. सर्वच बाजारपेठांत दुपारपासूनच नागरिकांची वर्दळ सुरू झाली. अनेक कुटुंबांनी दिवाळीच्या निमित्ताने साड्या, ड्रेस, कुर्ते, मुलांसाठी कपडे, तसेच घर सजावटीच्या वस्तू खरेदी केल्या. खरेदीदारांमध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. या वर्षी बाजारात वस्तूंच्या किमती थोड्या वाढल्या असल्या तरी सणासुदीच्या वातावरणात खरेदीचा आनंद कमी झालेला नाही, अशी भावना खरेदीदारांनी व्यक्त केली.
वस्त्रविक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, या वर्षी पारंपरिक वस्त्रांबरोबरच आधुनिक डिझाइन आणि फॅब्रिकची मागणी वाढली आहे, तसेच ई-कॉमर्स साइट्सवरदेखील ऑर्डरचा ओघ वाढला आहे. पुढील आठवड्यातील धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजेच्या आधी खरेदीत आणखी वाढ होईल. सणाच्या पार्श्वभूमीवर मिठाईच्या दुकानांमध्येही गोडधोड खरेदीसाठी मोठी लगबग दिसली. दिवाळीच्या फराळाच्या साहित्याची मागणी वाढल्याने किराणा दुकानदारांनाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
किमती वाढल्या, पण उत्साह तसाच
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी बहुतांश वस्तूंच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. कपड्यांचे दर, मिठाई, फटाके, तसेच इतर वस्तूंच्या किंमत वाढली आहे. मात्र त्याचा खरेदीवर परिणाम झालेला नाही. विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार, लोक उत्साहाने खरेदी करत आहेत; दिवाळी म्हणजे आनंदाचा सण, त्यामुळे किंमतवाढीचा फारसा परिणाम दिसत नाही.
साड्यांचे नवे प्रकार लोकप्रिय
या वर्षी बाजारात सिल्क, बनारसी, ऑर्गेन्झा आणि लिनन साड्यांचे नवे डिझाइन्स उपलब्ध झाले आहेत. खासकरून डिजिटल प्रिंट आणि हलक्या झरीच्या साड्या महिलांना आकर्षित करत आहेत. ग्राहकांना पारंपरिकतेसोबत आधुनिकतेचा संगम हवा आहे. त्यामुळे या साड्यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
कंदिलाची खरेदी
विविध रंग, आकार आणि डिझाईनचे आकर्षक कंदील बाजारात उपलब्ध झाल्याने नागरिकांची गर्दी वाढली आहे. पेपर, प्लास्टिक आणि फॅब्रिकपासून बनविलेले पर्यावरणपूरक कंदील या वर्षी विशेष लोकप्रिय ठरत आहेत.
दिवाळी जवळ आल्यानंतर दुकानांत मोठी गर्दी होत असते. त्यामुळे मी दरवर्षी साधारण याच काळात खरेदी करत असते. या काळात नवीन साहित्य असते. लवकर खरेदी केल्यानंतर दिवाळीची तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. यंदा वस्तूंच्या किमती वाढलेल्या दिसत आहेत.
- सोनाक्षी काळे, खरेदीसाठी आलेली महिला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.