कायदा काय सांगतो ?
- ॲड. जान्हवी भोसले
प्रश्न : आम्ही घर भाड्याने घेतले होते. त्यासाठी पाच ते सहा लाख रुपये खर्च झालेला आहे. घर मालकाचा एजंट आम्हाला जबरदस्ती घर खाली करण्यास सांगत आहे. भाडेकरार हा नोटराईज केलेला होता व मालकाच्या एजंटनेच केलेला होता. पोलिस कारवाई करून घर खाली करू, अशी धमकी दिली जात आहे, तर आम्ही काय करावे?
उत्तर : पोलिस तुम्हाला घरातून बाहेर काढू शकत नाहीत. त्याचे अधिकार न्यायालयाकडे आहेत. तुम्ही तुमच्या घर मालकाला नोटीस पाठवून सदर प्रकार कळवू शकता. तसेच तुम्ही स्वतः मालकाच्या एजंटविरुद्ध धमकी दिल्याची तक्रार पोलिसांकडे करू शकतात.
प्रश्न : आमच्या लग्नाला २० दिवस झालेले असून पत्नी मनोरुग्ण असल्याचे समोर आले आहे, एक वर्षाच्या आत घटस्फोटाचा दावा करता येतो का?
उत्तर : एक वर्षाच्या आत देखील घटस्फोटाचा दावा करता येतो. मानसिक आजार असल्याकारणाने तुम्ही घटस्फोटाचा दावा दाखल करू शकता. यासाठी तुमच्याकडे सरकारी दवाखान्याचे मनोरुग्ण असल्याचे सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे तुम्ही फसवणुकीचाही गुन्हा पत्नी व तिच्या आई-वडिलांवर दाखल करू शकता.
प्रश्न : माझे वय २५ वर्षे असून, मी नोकरी करते. मी घरच्यांच्या विरोधात प्रेमविवाह केला आहे. घरचे संपत्तीमधून मला बेदखल करण्याची धमकी देत आहत आहेत. ते असे करू शकतात का?
उत्तर : प्रत्येक सज्ञान व्यक्तीला आपल्या मनाप्रमाणे विवाह करण्याचा अधिकार आहे. यावर कोणीही बंधन लावू शकत नाही. तुम्ही घरच्यांच्या विरोधात प्रेमविवाह केला तर तुम्हाला स्वीकारायचे की नाही, हा संपूर्णपणे घरच्यांचा वैयक्तिक प्रश्न असेल. तरी देखील वडिलोपार्जित संपत्तीमधून तुम्हाला आई-वडील बेदखल करू शकत नाहीत. परंतु, यासाठी तुम्हाला वाटपाचा दावा (पार्टिशन सूट) दाखल करावे लागेल. वडील तुम्हाला त्यांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेमधून बेदखल करू शकतात.
प्रश्न : एखाद्या विकसकासोबत करार करताना कोणत्या बाबींकडे लक्ष देणे आवश्यक आहे?
उत्तर : विकसकासोबत करार करताना तो पूर्णतः लेखी स्वरूपात असणे अत्यावश्यक आहे. करारामध्ये प्रकल्पाचा मंजूर आराखडा, कमिन्समेंट सर्टिफिकेट आणि अन्य आवश्यक कायदेशीर मंजुरीचे दस्तऐवज तपासावेत. करारातील अटी व शर्ती काळजीपूर्वक वाचाव्यात व समजून घ्याव्यात. स्टॅम्प ड्यूटी, रजिस्ट्रेशन फी, जीएसटी यांचे सुस्पष्ट उल्लेख करारामध्ये असणे गरजेचे आहे. बांधकाम पूर्ण होण्याची ठोस तारीख त्यात असावी आणि विलंब झाल्यास नुकसानभरपाईची तरतूद असावी. जर एखाद्या कारणामुळे बांधकाम व्यावसायिक डिफॉल्टर ठरला किंवा कोणताही वाद उद्भवला, तर त्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर अटी व विवाद निवारणाची प्रक्रिया करारामध्ये स्पष्ट असावी. हा करार सब-रजिस्ट्रार कार्यालयात नोंदवणे कायदेशीरदृष्ट्या अनिवार्य आहे.
प्रश्न : माझ्या पत्नीने माझ्यावर घरच्यांच्या विरोधात कौटुंबिक हिंसाचाराची केस केली आहे. त्यात माझे मामा, मावशी, लग्न झालेली बहीण व तिच्या पतीचाही समावेश केलेला आहे. ते आमच्याकडे कधीही राहावयास नव्हते. ही कारवाई योग्य आहे का? आम्ही काय केले पाहिजे ?
उत्तर : कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण या कायद्यांतर्गत कोणत्याही नात्यात राहिलेली महिला घरगुती वादांवरून किंवा छळावरून न्यायालयात दावा करू शकते. परंतु, यामध्ये पीडित महिला ही अशाच व्यक्तींना प्रतिवादी करू शकते, ज्यांच्या सोबत ती एका घरामध्ये काही कालावधीसाठी ‘एकत्र कुटुंब’ पद्धतीमध्ये राहिलेली आहे. ज्या नातेवाईकांसोबत पीडित महिला कधी राहिलेलीच नाही, ज्यांचे घर स्वतंत्र आहेत, त्या नातेवाईकांविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा दावा करता येणार नाही.
प्रश्न : माझ्या पत्नीने कौटुंबिक हिंसाचाराचा दावा सोलापूर येथे दाखल केला आहे. मी पुण्यामध्ये राहतो. माझी पत्नी देखील पुण्यामध्ये नोकरीस आहे, परंतु त्रास देण्यासाठी तिच्या माहेरी तिने हा दावा दाखल केला आहे. त्यामध्ये पत्नी हजर राहत नाही, परंतु मला मात्र दर तारखेला सोलापूर येथे जावे लागते, यामध्ये काय करता
येईल. दावा पुण्यात दाखल होऊ शकतो का?
उत्तर : पत्नी अथवा पती ज्या ठिकाणी राहतात, ज्या ठिकाणी लग्न झाले, ज्या ठिकाणी पती-पत्नी शेवटचे सोबत राहिले आहेत त्या कोणत्याही शहरात, गावात कौटुंबिक हिंसाचाराचा दावा दाखल करता येतो. परंतु या प्रकरणांमध्ये आपण उच्च न्यायालयामध्ये हे शाबीत केले की पत्नी सोलापूर जिल्ह्यात राहत नसून पुण्यातच राहत आहे, तर दावा पुण्यामध्ये पाठवला जाऊ शकतो. परंतु पत्नीचा पुण्यातला पत्ता व पत्नी पुण्यातच नोकरीस आहे हे सिद्ध करणे गरजेचे आहे.
प्रश्न : घर हे संपूर्णपणे सासऱ्यांनी विकत घेतले असल्यास त्या घरामध्ये सुनेला राहायचा अधिकार असतो का?
उत्तर : घर हे सासऱ्यांनी स्वतःच्या स्वकष्टार्जित कमाईतून घेतले असल्यास तसेच नवरा घरात राहत नसल्यास सुनेला सासऱ्यांच्या घरामध्ये हक्क मागण्याचा अधिकार नाही. सासऱ्यांनी विकत घेतलेले घर हे सुनेसाठी वडिलोपार्जित मालमत्ता होऊ शकत नाही. जर सून जबरदस्ती घरात घुसली तर सासरचे सुनेला घरातून बाहेर काढण्यासाठी न्यायालयात दावा दाखल करू शकतात. नवऱ्याच्या मृत्यूनंतर देखील सासऱ्यांच्या स्वकष्टार्जित मालमत्तेत सून हक्क मागू शकत नाही.
वाचकांना कायदेविषयक काही शंका असल्यास त्यांनी law@esakal.com या ई-मेल आयडीवर पाठवाव्यात. त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.