पुणे

डब्बा ऑन, शटर डाउन!

CD

पुणे, ता. ८ : जेवणाची वेळ झाली आहे नंतर या.... एका तास बँक बंद आहे.... असे तुम्हा अनेकांना दुपारी एक ते तीनदरम्यान बँकेत गेल्यावर ऐकायला मिळते. काही ठिकाणी तर बँका जेवणाच्या वेळेत थेट शटर ओढून घेत आहेत, तर बहुतांश बँकांमध्ये जेवणाच्या वेळेचे किंवा काउंटर बंद असल्याचे फलक लावण्यात येत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळेत शेकडो नागरिक बँकेत येऊन ताटकळत उभे असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

दुपारी गेलो की बँका बंद असतात, तेथील कर्मचारी जेवणाच्या सुट्टीच्या (लंच ब्रेक) नावाखाली एक ते दीड तास जागेवर नसतात, त्यांना वाटेल त्या वेळेस सुट्टी घेतात, काही ठिकाणी तर थेट शटर खाली घेण्यात येते, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी बँक खातेदारांनी ‘सकाळ’कडे केल्या होत्या.
याबाबतची नेमकी परिस्थिती काय आहे? हे समजून घेण्यासाठी ‘सकाळ’च्या बातमीदारांनी दुपारी एक ते तीन या काळात शहरासह उपनगरांतील राष्ट्रीय (सरकारी) बँकांना भेटी दिल्या. त्यातील अनेक बँकांचे शटर जेवणाच्या सुट्टीवेळी खाली घेण्यात आले होते, तर अनेक बँकांमध्ये जेवणाच्या सुट्टीमुळे काउंटर बंद असल्याचे फलक लावले होते. अनेक बँका जेवणाच्या सुट्टीबाबत भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या नियमांचे उल्लंघन करताना दिसल्या.

बँक अधिकाऱ्यांचा बोलण्यास नकार
याबाबत बँक ऑफ महाराष्ट्रमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता, त्यांनी याविषयी भाष्य करणे टाळले. आम्ही याबाबत अधिकृत काही भूमिका मांडू शकत नाहीत, असे बँकेकडून सांगण्यात आले, तर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या प्रतिनिधींनीही या विषयावर बोलणे टाळले.

ग्राहकांचा त्रास वाढला
दुपारी बँकेत काही कामानिमित्त जाणाऱ्या ग्राहकांना दररोज ‘थोड्या वेळाने या’ असे सांगितले जाते. काही ठिकाणी ग्राहकांना २० मिनिटांपासून तासभर रांगेत थांबून परत जावे लागते. ‘‘आम्ही आमच्या कामावरून सुट्टी घेऊन बँकेत येतो; पण कर्मचारी जेवणावर गेलेले असतात. काही ठिकाणी तर थेट शटर खाली घेतले जाते,’’ अशी तक्रार अनेक खातेदारांनी केली. बँकांमध्ये जेवणाच्या नावाखाली कामकाज बंद ठेवण्याची पद्धत आता अनेक ठिकाणी रूढ झाली आहे. मात्र, ग्राहकांना ताटकळत उभे राहावे लागत आहे. तसेच वेळेचा अपव्यय आणि तक्रारींमध्ये वाढ झाल्याने या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.

सलग सेवा देणे अपेक्षित : अनास्कर
बॅंकेच्या कामकाजाच्या वेळेत (सकाळी १० ते दुपारी ४) नागरिकांना सलग सेवा मिळाली पाहिजे. त्यानुसार अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामाचे नियोजन केले पाहिजे. जेवणाच्या वेळेसाठी काउंटर बंद करू नये, असे स्पष्ट आदेश भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (आरबीआय) दिलेले आहेत. तसेच इंडियन बॅंक असोसिएशननेही तसे म्हटले आहे, अशी माहिती बॅंकिंग क्षेत्रातील अभ्यासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. हे आदेश राष्ट्रीयकृत, सहकारी आणि खासगी बॅंकांनाही लागू आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

‘सीबीएस’मुळे सलग सेवा शक्य
याविषयी स्टेट बॅंक ऑफ इंडियामधून निवृत्त झालेले एक वरिष्ठ अधिकारी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर म्हणाले, ‘‘बॅंकांमध्ये पाच दिवसांचा आठवडा आहे. तसेच कामाची आठ तासांची वेळही निश्चित झालेली आहे. पूर्वी बॅंकांचे कामकाज सकाळी १०.३० ते दुपारी २.३० पर्यंत चालायचे. नंतर त्याची वेळ वाढवून ते सकाळी ११ ते सायंकाळी ४ पर्यंत करण्यात आले आहे. इंडियन बॅंक असोसिएशन या कर्मचाऱ्यांच्या संघटनेने संबंधित बॅंकांशी वेळेबाबत चर्चा करून कामकाजाची वेळ आणि कामाचे तास निश्चित केले आहेत. त्यातही जेवणासाठी काउंटर बंद ठेवायचे, असे कुठेही म्हटले नाही. कामकाजाच्या वेळेत ग्राहकांना सलग सेवा द्यायची, हा आता नियम आहे.’’

सर्वच बॅंकांत आता ‘कोअर बॅंकिंग सोल्यूशन्स (सीबीएस) प्रणालीचा अवलंब केला जात आहे. त्यात प्रत्येक काउंटरवरील
कर्मचारी ग्राहकांची संबंधित सर्व कामे करू शकतो. पूर्वी ठराविक कर्मचारी विशिष्ट काम करायचा. आता तसे राहिलेले नाही. रोकडशी संबंधित कामे वगळता सर्व कामे सर्व कर्मचारी करू शकतात. त्यामुळे एखादा कर्मचारी जेवायला गेला, तरी दुसरा कर्मचारी ते काम करू शकतो. त्यामुळे जेवणाच्या वेळी काउंटर बंद न करता ग्राहकांना कामकाजाच्या वेळेत सेवा कशी मिळेल, याकडे अधिकारी-कर्मचाऱ्यांनी लक्ष दिले पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

जेवणासाठी काम बंदचा
‘आरबीआय’चा नियम नाही
मुंबई : जेवणाच्या ठराविक वेळेसाठी संपूर्ण बँकेचे काम ग्राहकांसाठी बंद ठेवावे, असा कोणताही नियम नसल्याची माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेच्या काही अधिकाऱ्यांनी नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली.
काही सरकारी बँकांमध्ये जेवणाच्या वेळेला बँकेचे शटर बंद करण्यात येते किंवा ग्राहकांच्या सेवा बंद करण्यात येतात. मात्र ‘आरबीआय’चा असा कोणताही नियम नाही. या संदर्भात ‘आरबीआय’चा प्रत्येक बँकेसाठी किंवा त्यांच्या प्रत्येक शाखेसाठी छोट्या स्तरावर नियम नाही. त्या-त्या बँका आपापले उपलब्ध मनुष्यबळ तसेच कामाची व्याप्ती, ग्राहकांची संख्या यानुसार निर्णय घेतात, असेही त्यांनी सांगितले.

काय आहेत ‘आरबीआय’चे नियम?
(परिपत्रक १ जुलै २०१४)
- ‘आरबीआय’कडून बॅंकांच्या कामकाजाची वेळ निश्चित
- सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत कामकाज सलग होणे अपेक्षित
- जेवणाच्या वेळेला काउंटर बंद करण्याचा प्रश्नच उद्‍भवत नाही
- जेवणाच्या वेळेत कर्मचाऱ्यांनी चक्राकार (रोटेशन) पद्धतीने काम करायचे
- एखादा कर्मचारी जेवणासाठी गेला तरी दुसरा कर्मचारी त्या काउंटरचे काम करेल
- अशा पद्धतीने व्यवस्थापक किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बॅंकांतील कामांचे नियोजन करणे अपेक्षित
- बँक बंद होण्यापूर्वी बँकेत प्रवेश केलेल्या सर्व ग्राहकांची कामे पूर्ण केली गेली पाहिजेत
- ‘आरबीआय’ने याबाबत वेळोवेळी परिपत्रकातही नमूद केले आहे
- स्थानिक स्तरावर कर्मचारी काउंटर बंद ठेवत असतील, तर त्याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ग्राहकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी

सर्व काउंटर कार्यरत ठेवण्याचे निर्देश
बँकांमध्ये जेवणासाठी ठराविक वेळ निश्चित केली आहे का? यासंदर्भात उत्तराखंडमधील हल्द्वानी येथील व्यावसायिक आणि जुनी चलननाणी संकलक प्रमोद गोल्डी यांनी माहिती अधिकाराद्वारे (आरटीआय) भारतीय रिझर्व्ह बँकेकडे माहिती मागविली होती. त्यावर ‘आरबीआय’ने १० मार्च २००७ मध्ये दिलेल्या उत्तरात स्पष्टपणे म्हटले आहे, की आरबीआयच्या बँकिंग नियमन विभागाने बँकांसाठी कोणतीही निश्चित जेवणाची वेळ ठरविलेली नाही. बँकांनी ‘लंच ब्रेक’च्या काळात ग्राहकांना बाहेर उभे ठेवणे किंवा शाखेचे दरवाजे बंद ठेवणे नियमबाह्य आहे. बँक सुरू झाल्यापासून बंद होईपर्यंत काउंटरवर ग्राहकांसाठी कर्मचारी उपलब्ध असणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics: डोंबिवलीत राजकीय पलटवार! भाजपचे माजी स्थायी समिती सभापती विकास म्हात्रे यांचा शिंदे गटात प्रवेश

Julie Yadav: घरी विसरलेला मोबाईल परत आणायला गेली अन्...; भारतीय महिला हॉकी खेळाडूचा दुर्दैवी मृत्यू, घटनेनं हळहळ

Organ Donation : अवयवदानासाठी राज्यांनी पुढाकार घ्यावा; रस्ते अपघातांतील मृतांबाबत केंद्र सरकारचे निर्देश देशात, अवयवदानाचे प्रमाण दहा लाखांमागे एक!

फी न दिल्यानं परीक्षेला बसू दिलं नाही, विद्यार्थ्यानं पेटवून घेतलं; प्राचार्य म्हणाले, २५ हजाराचा फोन अन् १ लाखाची गाडी वापरतो

Gujarat Ats : गुजरात एटीएसची मोठी कारवाई: 'रायसिन' विष तयार करणाऱ्या डॉक्टरसह तीन जण अटकेत!

SCROLL FOR NEXT