पुणे, ता. ४ : शहरातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने ॲप तयार केले, अभियंत्यांना कडक कारवाईचे आदेश दिले, तरीही खड्डे कायम आहेत. त्यानंतर आता रस्त्यांवरील खड्डे शोधून ते बुजविण्यासाठी पथ विभागाने क्षेत्रीय कार्यालयांमधील अभियंत्यांची विशेष पथके तयार केली आहेत. ही पथके आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून खड्ड्यांचा शोध घेऊन ते बुजविणार आहे.
‘खड्डेमुक्त पुणे अभियाना’चा प्रारंभ सोमवारी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्या हस्ते पार पडला.
या वेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर आदी अधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही महिन्यांत पोलिस खात्याच्या सीसीटीव्ही केबल टाकण्यासाठी शहरातील मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणावर खोदाई केली होती. या कामांनंतर रस्त्यांचे व पदपथांचे पुनर्वसन न झाल्याने अनेक रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. धोकादायक खड्डे, उखडलेले पदपथ आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या रस्त्यांमुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामुळे अभियंत्यांनी स्वतः रस्त्यावर उतरून खड्डे बुजविणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘खड्डेमुक्त पुणे’ करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे.
या अभियानाचा प्रारंभ सारसबाग येथील सणस मैदानासमोरील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानाच्या प्रवेशद्वाराजवळील खराब रस्त्याच्या दुरुस्तीने केला. येथे जुन्या रस्त्याचे मिलिंग करून नव्याने डांबर टाकून खड्डे बुजविण्यात आले. यानंतर शहरातील विविध भागांमध्ये ही मोहीम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार आहे.
पहिल्या टप्प्यात हे अभियान शहराच्या जुन्या हद्दीत राबविण्यात येईल. यासाठी पथ विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांच्या अभियंत्यांची पथके तयार केली आहेत. या पथकांसोबत ठेकेदारांचे कर्मचारी असतील. ही पथके नेमून दिलेल्या हद्दीत फिरून स्वतःहून खड्डे शोधून ते बुजवतील.
- अनिरुद्ध पावसकर,
पथ विभाग प्रमुख, पुणे महापालिका
‘ना नफा-ना तोटा’ तत्त्वावर काम
खड्डेमुक्त पुणे अभियान राबविताना महापालिकेच्या काही ठेकेदारांनी ‘ना नफा-ना तोटा’ तत्त्वावर काम करण्याची तयारी दर्शविली आहे. पथ विभागाने शहरातील सर्व मुख्य व आंतरिक रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
खड्ड्यांपेक्षा ठिगळांचा धोका
पुण्यातील रस्त्यांवर खड्ड्यांपेक्षा ठिकठिकाणी डांबराच्या ठिगळांचा (पॅचवर्क) धोका जास्त झालेला आहे. हे खड्डे बुजविण्यासाठी डांबर व खडी टाकली जाते, त्यांची व्यवस्थित दबाई केली जात नसल्याने भर रस्त्यात उंचवटे निर्माण झाले आहेत. ते समपातळीत नसल्याने वाहने आदळतात. त्याचा वाहनचालकांना प्रचंड त्रास होतो. तरीही महापालिकेकडून ठिगळ लावताना काळजी घेतली जात नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.