पुणे, ता. ५ : आपल्या दोन मुलींच्या उपचारासाठी इंग्लंडहून भारतात परतलेल्या दांपत्याला भोंदूबाबासह एका महिलेने अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढत तब्बल १४ कोटी रुपयांची फसवणूक केली. मुलींना आजारातून बरे करण्याच्या बहाण्याने कोथरूडमधील या कथित मांत्रिक महिलेने या दांपत्याला इंग्लंडमधील घरासह सर्व संपत्ती विकण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
याबाबत दीपक डोळस यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार दिली आहे. डोळस हे इंग्लंडमध्ये आयटी क्षेत्रात कार्यरत होते. मुलींच्या उपचारासाठी ते २०१० मध्ये भारतात परतले. भजनी मंडळाच्या माध्यमातून २०१८ मध्ये त्यांची ओळख एका कथित भोंदूबाबाशी झाली. त्याने या दांपत्याची ओळख एका महिलेशी करून दिली. त्यावर या महिलेने ‘तुमच्या मुलींचे आजार ठीक करेन, पण माझे सर्व ऐकावे लागेल,’ असे सांगितले. या महिलेने डोळस दांपत्याला कोथरूड येथील घरी भोंदूबाबांच्या भेटीस बोलावले. तिने डोळस दांपत्याचा विश्वास संपादन करून, त्यांच्या संपत्तीची माहिती काढली. ‘तुमच्याकडील संपत्तीमुळेच मुलींचे आरोग्य धोक्यात आहे, ही मालमत्ता विकली तरच मुली आजारातून बऱ्या होतील,’ असे सांगून स्वत:च्या बँक खात्यांमध्ये व्यवहार करवून घेतले. त्यानंतर तिच्या सांगण्यावरून त्यांनी इंग्लंडमधील ड्युप्लेक्स घर, फार्महाऊस, कोकण आणि सासवडमधील शेतजमीन विकून सुमारे १४ कोटी रुपये देऊन टाकले.
इतकी मोठी रक्कम दिल्यानंतरही मुलींच्या आजारात सुधारणा झाली नाही. तरीही त्या महिलेने डोळस दांपत्याला २०२४ मध्ये राहते घर विकण्यास सांगितले. त्यामुळे त्यांना आता भाडेतत्त्वावर राहण्याची वेळ आली आहे. भाडे भरण्याचीही आर्थिक परिस्थिती नाही, असे दांपत्याने तक्रारीत म्हटले आहे. याबाबत त्यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार दिली असून, गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
‘‘या संदर्भात पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार प्राप्त झाली आहे. या प्रकरणाची चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे.
डोळस दांपत्याने फसवणूक झाल्याबाबत पोलिस आयुक्त कार्यालयात तक्रार दिली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
- ॲड. विजयसिंह ठोंबरे, डोळस दांपत्याचे वकील.
-------
असा घडला घटनाक्रम....
२०१० : मुलींच्या उपचारासाठी डोळस दांपत्य इंग्लंडहून भारतात परतले.
२०१८ : भजनी मंडळातून भोंदूबाबाशी ओळख; त्याने मांत्रिक महिलेशी संपर्क करून दिला.
२०१९- २०२१ : ‘संपत्तीमुळे आजार झाला’ अशी बतावणी करून दांपत्याकडून कोट्यवधी रुपये उकळले.
२०२२ : ‘घरात दोष आहे’ असे सांगून घर विकण्यास लावले, ती रक्कमही महिलेच्या खात्यात जमा.
२०२३-२०२४ : इंग्लंडमधील घर, शेतजमीन व पॉलिसींची रक्कमही काढायला लावली
२०२४ - अखेरीस राहत्या घरावर १.७७ कोटींचे कर्ज घेऊन ती रक्कम दिली.
२०२५ : सर्व संपत्ती गमावल्यानंतर डोळस दांपत्य सध्या पुण्यात भाड्याच्या घरात राहत आहे.
-------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.