पुणे, ता. ५ : नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांनंतर लगेचच राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला, तर मतदान यंत्रे अन्य राज्यांमधून मागवावी लागणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला मतदान यंत्रांच्या जुळवाजुळवीसाठी धावपळ करावी लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीअखेर पूर्ण कराव्यात, असा आदेश दिला आहे. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २४६ नगर परिषदा आणि ४२ नगर पंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि ३ नगर पंचायतींचा समावेश आहे. यासाठी २ डिसेंबर रोजी मतदान होणार असून, ३ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.
राज्यात यापूर्वीच मध्य प्रदेशातून मतदान यंत्रे आणि कंट्रोल युनिट मागविण्यात आले आहेत. पुणे जिल्ह्यातही सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात ही यंत्रे आली आहेत. जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्या तर अन्य राज्यांतून यंत्रे मागवावी लागणार आहेत. तसे करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे, असे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी नाव न देण्याच्या बोलीवर सांगितले.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रांमध्ये मतदानाची माहिती संरक्षित केलेली असते. राज्य निवडणूक आयोग घेत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वेगळे यंत्र वापरले जाते. त्यासाठी कंट्रोल युनिटमध्ये स्वतंत्र मेमरी टाकलेली असते. मतदानाची माहिती यात संरक्षित केली जाते. जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता जाहीर झाल्यास ही मेमरी काढून नवी मेमरी टाकता येते, तरच ही यंत्रे वापरता येणार आहेत. मात्र, त्यासाठी नव्या मेमरीची व्यवस्था करावी लागणार आहे. अन्यथा नवी यंत्रे तरी मागवावी लागणार आहेत, असेही ते म्हणाले.
अशी आहे स्थिती
- राज्य निवडणूक आयोगाने १५ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या बैठकीत पुणे जिल्हा परिषदेसाठी सुमारे ८ हजार १४६ मतदान केंद्रे गृहीत धरण्यात आली आहेत.
- मतदान यंत्रांची संख्या ८ हजार १४६ व कंट्रोल युनिट ४ हजार ७३ इतकी असतील
- गट व गणनिहाय अंतिम मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर यात थोडा बदल होण्याची शक्यता
- जिल्ह्यात सध्या ८ हजार १४६ मतदान यंत्रे आणि ४ हजार १५२ कंट्रोल युनिट उपलब्ध
- ही संख्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी आवश्यक असलेल्या मतदान केंद्रांच्या संख्येनुसार गृहीत धरली आहे
- त्यात नगर परिषदांच्या निवडणुकीसाठी यंत्रांची संख्या गृहीत धरण्यात आलेली नव्हती
- जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि ३ नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी ८११ कंट्रोल युनिट आणि १ हजार ६२२ मतदान यंत्रे लावण्यात येणार आहेत
- ही यंत्रे जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या यंत्रांमधूनच दिली जाणार आहेत
- २ डिसेंबरच्या दरम्यान जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झाल्यास कमी पडत असलेल्या यंत्रांची पूर्तता करावी लागणार आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.