पुणे, ता. ७ ः सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त रात्रभर चालणाऱ्या ललित पौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (ता. ८) रात्री नऊ वाजेपासून सुरू होणारा हा उत्सव रविवारी (ता. ९) सकाळी सात वाजेपर्यंत सुरू असेल.
ललित कला केंद्राच्या गुरुकुल विभागातर्फे गेल्या काही वर्षांपासून या उत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवात गुरुकुल विभागाचे माजी विद्यार्थी रात्रभर संगीत, नृत्य आणि नाटकांचे सादरीकरण करत असतात. निराशेच्या अंधारावर मात करून आशेचा प्रकाश पसरविण्याचा संदेश देणारा हा उत्सव आहे, अशी माहिती केंद्राचे विभागप्रमुख डॉ. प्रवीण भोळे यांनी दिली.
या उत्सवात अरुंधती चापेकर यांचा ‘सान्निधिम्’, सायली पानसे यांचा ‘अष्टनायिका २.०’ हे विशेष कार्यक्रम, डॉ. परिमल फडके व सई शेट्ये यांचे भरतनाट्यम, अनिता दाते, सुहास शिरसाठ, उमेश जगताप यांच्या ‘वेड्या कविता’, ‘द किटर्केट क्लब’ नावाची पाश्चिमात्य सांगीतिका व इतर एकल सादरीकरणे, अमन वरखेडकर यांचे व्हायोलिन वादन आदी कार्यक्रम सादर होणार आहेत. ललित कला केंद्राच्या अंगण मंचावर सादर होणाऱ्या या कार्यक्रमाला ऐच्छिक प्रवेश मूल्य आहे. यातून जमा झालेली रक्कम अतिवृष्टी भागातील लोककलावंतांना मदत म्हणून देण्यात येणार आहे.