पांडुरंग सरोदे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ७ ः महापालिकेच्या वाहनतळांवर महिनाभर वाहन पार्किंग करण्यासाठी नागरिकांना तब्बल चार ते पाच हजार रुपये मोजावे लागतात. रात्रीच्या वेळी वाहन पार्किंग करणाऱ्या नागरिकांकडूनही ३०० ते ५०० रुपये उकळले जातात. तर एरवी व सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिकांना पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याचे सांगितले जाते, प्रत्यक्षात मोठ्या व्यावसायिकांच्या ग्राहकांसाठी ‘आर्थिक गणित जुळवून’ पार्किंग राखीव ठेवण्याचा गंभीर प्रकारही महापालिकेच्या वाहनतळांवर सध्या सुरू आहे.
शहरातील बुधवार पेठ, शनिवार पेठ, नारायण पेठ, शुक्रवार पेठ, सदाशिव पेठ, गुरुवार पेठ या पेठांमध्ये जुने वाडे, जुन्या इमारती असल्याने तेथे वाहने पार्किंगची समस्या मोठी आहे. बहुतांश वाडे, सोसायट्यांमध्ये पार्किंग नसल्याने नागरिक आपली वाहने रस्त्यांवर लावतात. मात्र, मागील काही वर्षांमध्ये पेठांमध्ये वाहनांची तोडफोड, जाळपोळ, वाहनांची किंवा वाहनाच्या सुट्या भागांची चोरी यांसारख्या घटना घडल्या. मद्यपी, टवाळखोरांबरोबरच प्राण्यांकडूनही वाहनांचे नुकसानही होते. तसेच रस्त्यांवर वाहने पार्किंग केल्यास वाहतूक पोलिसांची दंडात्मक कारवाई व मानसिक त्रासही सहन करावा लागतो. या सगळ्या कारणांमुळे स्थानिक नागरिकांकडून महापालिकेच्या वाहनतळांवर वाहने पार्किंग करण्यास प्राधान्य दिले जाते. मात्र, त्यासाठी खिशाला चांगलीच कात्री लागत असल्याची सद्यःस्थिती आहे. एक महिन्यासाठी वाहन पार्किंग करण्यासाठी चार ते पाच हजार रुपये, तर वर्षभर पार्किंग करण्यासाठी तीन ते चार हजार रुपये इतके पैसे नागरिकांना मोजावे लागतात. संबंधित वाहनांसाठी वाहनतळाच्या सर्वांत वरील मजले उपलब्ध करून दिले जातात. मध्यवर्ती भागांसह पुणे स्टेशन परिसरातील वाहनतळांवर नागरिकांना हा अनुभव येतो.
महापालिकेकडून ठेकेदारांना मोकळे रान
महापालिकेने आपल्या पार्किंगच्या धोरणामध्ये ठेकेदाराने मासिक पाससाठी किती रक्कम घ्यावी, याबाबतची तरतूद केलेली नाही. त्याबाबतचा निर्णय ठेकेदाराने त्यांच्या स्तरावर घ्यावा, असा उल्लेख करून दरमहा वाहन पार्किंगसाठी ठेकेदारांना पैसे घेण्यासाठी मोकळे रान ठेवले आहे. त्यामुळे प्रत्येक वाहनतळाच्या ठिकाणी ठेकेदाराकडून दोन हजार रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंतची रक्कम वाहनाच्या पार्किंगसाठी दरमहा घेतली जात आहे.
‘राखीव पार्किंग’
महापालिकेच्या वाहनतळांवर सणासुदीच्या काळात तसेच एरवीदेखील सर्वसामान्य नागरिकांना वाहनांचे पार्किंग भरले असल्याचे सांगण्यात येते. प्रत्यक्षात वाहनतळांवरील पार्किंगसाठी पेठांमधील मोठ्या व्यावसायिकांसाठी अर्थपूर्ण व्यवहार करून राखीव ठेवले जातात. संबंधित व्यावसायिकांचे ग्राहक व त्यांच्या कर्मचाऱ्यांचीच वाहने लावण्यात येतात.
येथेही नागरिकांची लूट
महापालिकेच्या बाजारपेठा, रेल्वे व बसस्थानकांवरील वाहनतळांवरच नागरिकांची लूट होते असे नाही, तर कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालय, सारसबाग, पु. ल. देशपांडे उद्यान, बालगंधर्व रंगमंदिर या ठिकाणीदेखील पार्किंगच्या नावाखाली जादा पैसे घेऊन नागरिकांची लूट सुरू आहे. तेथेही वाहनतळांवर दुचाकीसाठी १० रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी २० ते ५० रुपये इतके दर सर्रासपणे आकारले जातात. बालगंधर्व येथील पार्किंगचा वापर तर हॉटेल्स, रेस्टॉरंट व बांधकाम व्यावसायिकांची वाहने लावण्यासाठी होतो. नाट्यगृहात येणाऱ्या प्रेक्षकांना त्यांची वाहने रस्त्यावर लावण्याची वेळ येते.
तांबडी जोगेश्वरी लेनमधील वाहनतळ खासगी
बुधवार पेठेतील तांबडी जोगेश्वरी लेन येथील वाहनतळ हा महापालिकेचा असल्याबाबतचे छायाचित्र शुक्रवारी प्रसिद्ध झाले होते. मात्र संबंधित वाहनतळ हा खासगी मालकीचा आहे.