पुणे

ससूनमध्‍ये अवघ्या पाच हजारांत ‘पेट स्कॅन’

CD

पुणे, ता. ७ : कर्करोगाचा शरीरात किती व कोठे प्रसार झाला आहे याची तपासणी करण्‍यासाठी असलेली ससून रुग्णालयातील ‘पॉझिट्रॉन एमिशन टोमोग्राफी’ (पेट स्कॅन) तपासणी आता पुन्हा पूर्ववत सुरू झाली आहे. ती गेल्‍या काही दिवसांपासून बंद होती. बाहेर खासगी रुग्‍णालयात किंवा स्‍वतंत्र ‘पेट स्‍कॅन’ केंद्रात ही तपासणी करण्‍यासाठी १५ ते २५ हजार रुपये खर्च येतो. परंतु, तीच तपासणी येथे अवघ्या पाच हजारांत होत असल्‍याने कर्करोग निदानासाठी प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून तपासणी करणारे तांत्रिक मनुष्यबळ उपलब्‍ध नसल्याने रुग्णालयातील ‘पेट स्कॅन’ मशिन बंद होती. त्यामुळे तपासणीसाठी रुग्णांना खासगी निदान केंद्रांकडे जावे लागत होते. खासगीमधील खर्च सर्वसामान्‍यांना परवडणारा नसल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागत होता. दरम्‍यान, ससून रुग्णालयातील पेट स्कॅन मशिनसाठी तांत्रिक तज्ज्ञांची नेमणूक करण्यात आली असून, आवश्यक प्रमाणपत्रे मिळाल्यानंतर तपासणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दररोज सरासरी ४ ते ५ ते जणांची तपासणी होते. शुक्रवारपासून रुग्‍णांची तपासणीदेखील सुरू झाली असून, ज्‍या आर्थिक दुर्बल घटकांना ही तपासणी परवडत नाही त्या रुग्‍णांच्‍या आर्थिक परिस्थितीचे मूल्यमापन करून त्‍यांची तपासणी मोफत केली जाते, अशी माहिती रुग्‍णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्‍लपा जाधव यांनी दिली.
रुग्णांची एकाच वेळी होणारी गर्दी टाळण्यासाठी त्यांची पूर्वनोंदणी करण्‍यात येते व वेळ देऊन ती तपासणी करण्‍यात येते. या तपासणीतून शरीरातील कर्करोगाच्या पेशींची स्थिती, शरीरात कोठे व कोणत्‍या अवयवात प्रसार झाला आहे हे कळते. त्‍यामुळे कर्करोगतज्‍ज्ञाला उपचारांची दिशा ठरवता येते. तसेच उपचारांच्या परिणामकारकतेचेही परीक्षण करता येते. कर्करोग उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी ही तपासणी अत्यंत महत्त्वाची असल्याने तिची पुन्हा सुरुवात ही मोठी दिलासादायक बाब रुग्‍णांसाठी ठरत आहे. पेट स्कॅन तपासणी पुन्हा सुरू झाल्याने ससून रुग्णालयातील सेवा पूर्ववत झाली असून, गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांना आता किफायतशीर दरात ही अत्याधुनिक सुविधा मिळण्यास मदत होत आहे, अशी माहिती रुग्‍णालयाचे अधिष्‍ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी दिली.

Manoj Jarange: जरांगेंच्या हत्येचा कट रचणारा अमोल खुणे नेमका कोण? जुना सहकारी सुपारीबाज कसा झाला?

Solapur Factory : प्रथमेश पाटील यांना संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती!

Richa Ghosh DSP Appointment : विश्वविजेती रिचा घोष आता थेट ‘DSP’ ; 'बंग भूषण' पुरस्काराने देखील सन्मानित!

स्कॅमर्सनी LinkedIn वर बनवला अड्डा! Commonwealth च्या नावाखाली लोकांची होतीये लूट, तुम्ही पण लिंक्डइनवर असाल तर हे काय आहे बघाच

Latest Marathi News Live Update : वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ

SCROLL FOR NEXT