पुणे

पाच डिसेंबरपासून आरोग्याचा महोत्सव ‘स्वास्थ्यम्’ पुण्यात नामवंत वक्त्यांचे मार्गदर्शन अन् दर्जेदार कार्यक्रमांची पर्वणी

CD

पुणे, ता. ८ ः संतुलित जीवनाचा मार्ग दाखवणारा सर्वांगीण आरोग्याचा भव्य महोत्सव म्हणजे ‘सुहाना स्वास्थ्यम्’! सकाळ माध्यम समूहातर्फे समाजाच्या समग्र कल्याणाच्या उद्देशातून आयोजित या आगळ्यावेगळ्या महोत्सवाचे यंदा चौथे वर्ष आहे. यावर्षी हा महोत्सव अधिक व्यापक झाला असून, ५ ते ७ डिसेंबर दरम्यान पुण्यात विविध ठिकाणी हा महोत्सव होणार आहे.
जीवनाच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करणाऱ्या या स्वास्थ्यजागराला मागील तीनही वर्षांमध्ये पुणेकरांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. महोत्सवातील प्रत्येक व्याख्यानाला, कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावर्षी महोत्सवाची व्याप्ती अधिकच वाढली असून, तीन दिवस दर्जेदार कार्यक्रमांची पर्वणी मिळणार आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजलेल्या नामवंत वक्त्यांच्या मार्गदर्शनाचा यात समावेश आहे.
‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ या महोत्सवासाठी ‘सुहाना मसाले’ हे मुख्य प्रायोजक आहेत. विश्वकर्मा विद्यापीठ हे सहप्रायोजक असून, भारती विद्यापीठ हे सहयोगी प्रायोजक आहेत. ५ डिसेंबरला सायंकाळी ६.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात ‘अमृतानुभव’ या अनोख्या कार्यक्रमाने ‘स्वास्थ्यम्’ या महोत्सवाला सुरवात होणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जयंती उत्सवानिमित्त ही कलाकृती सादर केली जाणार आहे. श्रीरंग गोडबोले लिखित-दिग्दर्शित हा कार्यक्रम ज्येष्ठ गायक रघुनंदन पणशीकर, ज्येष्ठ गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, संकर्षण कऱ्हाडे, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, राहुल जोशी, आनंदी जोशी, सचिन इंगळे हे कलाकार सादर करणार आहेत. संतसाहित्यातील ज्ञानामृत संगीत आणि निरुपणाच्या माध्यमातून हा कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
दुसऱ्या दिवशी म्हणजेच ६ डिसेंबरला देशातील आघाडीच्या आणि लोकप्रिय गायिका सुनिधी चौहान यांच्या सादरीकरणाची पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे. सुनिधी यांची ‘आय ॲम होम’ ही लोकप्रिय कॉन्सर्ट कोथरूडच्या सूर्यकांत काकडे फार्म येथे सायंकाळी ७ वाजता सादर होणार आहे. आपल्या जादूई आवाजाने आणि अनोख्या गायन शैलीने रसिकांची मने जिंकणाऱ्या सुनिधी यांची गाणी प्रत्यक्षात ऐकणे, हा अविस्मरणीय अनुभव असतो. हा अनुभव घेण्याची संधी पुणेकरांना मिळेल.
महोत्सवाचा अखेरचा दिवस, ७ डिसेंबर हा नामवंत वक्त्यांच्या मार्गदर्शनाची पर्वणी देणारा ठरणार आहे. संगमवाडी येथील मंगलदास रस्त्यावरील हॉटेल कॉनरॉड येथे दिवसभर विविध वक्त्यांची मार्गदर्शन सत्रे होणार आहेत. यात प्रसिद्ध आध्यात्मिक गुरू श्री एम यांच्यासह लेफ्टनंट जनरल (निवृत्त) विनोद खंदारे, ज्येष्ठ लेखिका व पुराण अभ्यासक सीमा आनंद, फूड फार्मर व आरोग्य अभ्यासक रेवंत हिंमत्सिंगका, अर्थशास्त्राच्या अभ्यासक व शिक्षक चंद्रलेखा एम. आर. आणि स्टँडअप कॉमेडियन रवी गुप्ता या वक्त्यांच्या सत्रांचा यात समावेश आहे.

‘स्वास्थ्यम्’ महोत्सवातील पहिल्या दोन्ही दिवसांच्या कार्यक्रमांना तिकिटे आहेत. तिसऱ्या दिवसाच्या मार्गदर्शन सत्रांना विनामूल्य प्रवेश आहे; मात्र नोंदणी आवश्यक आहे. ही तिकिटे आरक्षित करण्यासाठी किंवा नोंदणी करण्यासाठी बातमीसोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करावा आणि या आगळ्यावेगळ्या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सकाळ माध्यम समूहाने केले आहे.
यापूर्वी ऑक्टोबरमध्ये ‘वॉकेथॉन’ उपक्रमाने ‘स्वास्थ्यम्’ची नांदी झाली होती. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त पुण्यासह कोल्हापूर, नाशिक आणि नागपूर येथे झालेल्या उपक्रमात दहा हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला होता. या यशस्वी उपक्रमानंतर आता डिसेंबरमध्ये मुख्य महोत्सव होत आहे.
----
‘स्वास्थ्यम्’चा उद्देश
अध्यात्म म्हणजे वैराग्य किंवा संन्यास, असा सहसा गैरसमज होतो. तो दूर करून भौतिक आणि आध्यात्मिक जीवनाची सांगड घालत समाजाला संतुलित जीवनाचा मार्ग दाखवण्याचे काम या महोत्सवातून केले जाते. शारीरिक, मानसिक, भावनिक आणि आध्यात्मिक टप्प्यांवर स्वास्थ्यपूर्ण व संतुलित राहण्यासाठी शास्त्रोक्त मार्गदर्शनाचा या महोत्सवात समावेश असतो. केवळ व्याख्याने किंवा प्रवचन नाही, तर तज्ज्ञांच्या कृतिशील कार्यशाळा या उपक्रमात आहेत. समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणे आणि समाजाचे समग्र कल्याण करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
----

‘स्वास्थ्यम्’चे वेळापत्रक ः
५ डिसेंबर - ‘अमृतानुभव’ कार्यक्रम - बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता - सायंकाळी ६.३० वाजल्यापासून
६ डिसेंबर - सुनिधी चौहान मैफील - सूर्यकांत काकडे फार्म, कोथरूड - सायंकाळी ७ वाजल्यापासून
७ डिसेंबर - नामवंत वक्त्यांची मार्गदर्शन सत्रे - हॉटेल कॉनरॉड, मंगलदास रस्ता, संगमवाडी - सकाळी १०.३० वाजल्यापासून
फोटोः 66314, 66315, 66316, 66317, 66318, 66320, 66323, 66325

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tej Pratap Yadav : बिहार निवडणूक सुरू असतानाच केंद्र सरकारचा तेजप्रताप यादव बाबत मोठा निर्णय!

Kannad Election : उमेदवार शोधण्यासाठी राजकीय पक्षाची होतय दमछाक; कन्नडला अद्यापही युती, आघाडीसंदर्भात राजकीय पक्षांच्या हालचाली थंडच!

Bopodi Land Scam : बोपोडी जमीन व्यवहार प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे; शीतल तेजवानीचे परदेशात पलायन?

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

PMC Recruitment : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT