पुणे, ता. १२ ः शिक्षकांच्या बदलीची ऑनलाइन प्रक्रिया सुरू असली तरी, नियुक्ती पत्र देण्यास विलंब होण्याची चिन्हे आहेत. कारण, दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्राच्या फेरतपासणीचा प्रश्न प्रलंबितच आहे. शिक्षण विभागाकडून आणि आरोग्य विभागाकडून सध्या एकमेकांना पत्रव्यवहार सुरू आहे. त्यावर ठोस कुठलाच निर्णय झालेला नाही.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची सध्या ऑनलाइन बदली प्रक्रिया सुरू आहे; परंतु काही शिक्षकांनी सोईच्या बदलीसाठी विशेष संवर्ग एकमधून अर्ज करून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र जोडले असल्याचा आरोप संघटनांकडून करण्यात आला. त्यावर जिल्हा परिषद प्रशासनाकडून बदली प्रक्रियेतील दिव्यांग प्रमाणपत्र दिलेल्या शिक्षकांची फेरतपासणी करण्याचे निश्चित केले. त्यासाठी ससून रुग्णालयापासून ते मुंबईतील रुग्णालयांना प्रमाणपत्रांची फेरतपासणी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पत्रव्यवहार केला. पण समोरून प्रत्येकवेळी विविध कारणे, नियम दाखवून फेरतपासणी करण्यास असमर्थता दर्शवली. हे सर्व सुरू असतानाच संघटनांकडून आक्रमक पवित्रा घेत आंदोलन केले. पुन्हा शिक्षण विभागाकडून आरोग्य उपसंचालकांकडे पत्रव्यवहार केला. त्यावर पुन्हा एकदा पत्रव्यवहार झाला, यामध्ये स्पष्टपणे नकार दिलेला नाही; परंतु उपसंचालक कार्यालयाकडून प्राथमिक शिक्षणाधिऱ्यांना आता शिक्षकांचे ऑनलाइन ‘यूडीआयडी’ दिव्यांग प्रमाणपत्र मिळाले नसल्याचे म्हटले आहे. ‘यूडीआयडी’ दिव्यांग प्रमाणपत्र स्पष्ट दिसणाऱ्या प्रती एकत्रित आणून देण्याचे सांगण्यात आले आहे.
दोन महिन्यांपासून पत्र पाठवणे सुरू
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि आरोग्य विभाग तसेच वेगवेगळ्या रुग्णालयांना पत्रव्यवहाराची ही सर्व प्रक्रिया मागील साधारण दीड ते दोन महिन्यांपासून सुरू आहे. यामध्ये सर्वच शिक्षकांची बदली प्रक्रियेला विलंब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण, सर्वच शिक्षकांना एकाचवेळी नियुक्ती आदेश देण्यात येतात. दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्राची फेरतपासणी झाल्यानंतरच सर्व शिक्षकांना नियुक्ती आदेश देता येतील, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
संवर्ग एकमध्ये यांचा समावेश
पुणे जिल्हा परिषदेतील संवर्ग एकमधील ४९१ पेक्षा अधिक दिव्यांग शिक्षकांची बदली प्रक्रिया सुरू आहे. त्या प्रक्रियेअंतर्गत विविध आजारांनी ग्रस्त शिक्षक, दिव्यांग शिक्षक, दिव्यांग मुलांचे पालक, परितक्त्या, घटस्फोटित महिला शिक्षक, ५३ वर्ष पूर्ण झालेले शिक्षक, विधवा, कुमारिका शिक्षक, तसेच ज्या शिक्षकांचे जोडीदार गंभीर आजाराने त्रस्त आहेत, अशा शिक्षकांचा समावेश करण्यात आला आहे.
दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्राची फेरतपासणी करण्याबाबत आरोग्य उपसंचालकांना पत्र दिले आहे. त्यांना प्रमाणपत्रांच्या प्रती दिल्या जाणार आहेत. त्यानंतर त्यांच्याकडून तपासणीबाबत शिबिर आयोजित केले जाणार आहे.
- संजय नाईकडे, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)
दिव्यांग शिक्षकांच्या प्रमाणपत्राची फेरतपासणीची मागणी जिल्हा परिषदेला सातत्याने करत आहोत. ही तपासणी जे. जे. रुग्णालयाकडून करण्यात यावी, शिवाय ही तपासणी कॅमेऱ्याच्या देखरेखीमध्ये व्हावी. आम्ही आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनाही भेटून निवेदन दिले आहे.
- धर्मेंद्र सातव, अध्यक्ष, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.