पुणे, ता. २५ : ‘मराठी प्रकाशन व्यवसायातील वाढत्या अडचणी आणि विस्कळित होत चाललेल्या वितरण व्यवस्थेला एकत्रित स्वरूप देण्यासाठी १५ सप्टेंबर २०२५ रोजी ‘मराठी प्रकाशक आणि वितरक संस्था’ स्थापन करण्यात आली आहे,’ अशी माहिती संस्थेच्या अध्यक्षा सुनीताराजे पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अनेक दशकांची परंपरा असलेल्या मराठी प्रकाशकांना सोशल मीडिया आणि ‘एआय’च्या वाढत्या प्रभावामुळे बाजारपेठेत नवीन आव्हानांचा सामना करावा लागत आहे. कोरोनानंतर कागदाचे वाढलेले दर, मुद्रण-बाइंडिंगवरील वाढलेला जीएसटी, बँकांकडून कर्ज न मिळणे आणि जिल्हास्तरावर पुस्तकविक्रीची कमतरता या कारणांमुळे प्रकाशन व्यवसाय गंभीर अवस्थेत पोहोचला आहे, असेही पवार यांनी या वेळी सांगितले. संस्थेचे कार्यवाह अतुल खोपकर, कार्याध्यक्ष कुणाल ओंबासे या प्रसंगी उपस्थित होते.
पवार म्हणाल्या ‘व्यवसायाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि मराठी पुस्तकांचे प्रभावी वितरण करण्यासाठी प्रकाशक, वितरक तसेच पुस्तकनिर्मितीशी संबंधित सर्व घटकांना संघटित करणे आवश्यक आहे. संस्था पुस्तकाला जीवनावश्यक वस्तूचा दर्जा मिळावा, जिल्हावार ग्रंथप्रदर्शने व्हावीत, शासनाच्या ग्रंथखरेदी योजनांना चालना मिळावी तसेच नव्या प्रकाशकांना मार्गदर्शन मिळावे, संमेलनात, ग्रंथ प्रदर्शनात प्रकाशकांची अव्यवस्था होऊ नये म्हणून प्रयत्न करणे, वितरक वाढविण्यासाठी प्रयत्न करणे, सरकार दरबारी प्रकाशन क्षेत्रातील अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे, वितरकांना साहाय्य करणे, नव्या प्रकाशकांना मार्गदर्शन करणे, साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करणे, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ऑनलाइन वितरणव्यवस्था सक्षम करणे आदी कामांबाबत प्रयत्नशील राहणार आहे.’