पुणे, ता. ५ : ‘‘नवोदित कलाकारांनी आपले काम समरसून करण्याचा प्रयत्न करावा. लोकांना आवडेल अथवा नाही, हे महत्त्वाचे नसून आपण आपले काम चोख करणे आणि आपल्याला ते पटणे महत्त्वाचे आहे. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवण्याची किंवा अन्य कोणत्याही फळाची अपेक्षा करू नका. कामात सातत्य ठेवा, तर यश नक्की मिळेल’’, असा कानमंत्र ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी विद्यार्थी कलाकारांना दिला.
सकाळ करंडक आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या महाअंतिम फेरीचे पारितोषिक वितरण हट्टंगडी यांच्या हस्ते झाले. पारितोषिक वितरणापूर्वी ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी आणि लेखिका-अभिनेत्री मुग्धा गोडबोले यांनी हट्टंगडी यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी महाअंतिम फेरीचे परीक्षक निपुण धर्माधिकारी, प्रदीप वैद्य उपस्थित होते. ‘रांजेकर रिअल्टी’ आणि ‘बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी’ हे या स्पर्धेचे प्रायोजक होते.
हट्टंगडी म्हणाल्या, ‘‘कोणत्याही प्रकारच्या प्रशिक्षणामुळे विचार करण्याची पद्धत मिळते. माझा या क्षेत्रातील पाया रंगभूमीने तयार केला आहे. चित्रपटातील माझे कामही याच पायावर आधारित होते. कारण, रंगभूमीने मला शिस्त लावली. अन्य माध्यमे वेगळी असली तरी, विचार करण्याची पद्धत रंगभूमीवरील कामातूनच मला मिळाली होती. आपल्या व्यक्तिरेखेचा अभ्यास, त्यासाठीची तांत्रिक तालीम करणे, याची सवय मला नाटकामुळे लागली.’’
निपुण धर्माधिकारी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाले, ‘‘नाटकात काम करताना माध्यमाचे भान ठेवणे आवश्यक आहे. अनेक नाटकांमधील प्रसंग पाहताना दिग्दर्शकाने कॅमेऱ्यासारखा विचार करून नाटक बसवल्याचे जाणवले. ‘मोंताज सिक्वेन्स’ तर नाटकात अनावश्यक असतात. या गोष्टी विद्यार्थ्यांनी टाळायला हव्यात. चांगले नाटक करता येण्यासाठी चांगले नाटक पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अधिकाधिक नाटके पाहायला हवीत.’’
‘सकाळ करंडक’ हा एक अविस्मरणीय अनुभव ठरला. विद्यार्थ्यांनी दर्जेदार सादरीकरण करून लोकांना थक्क केले. अशा उपक्रमांमधून नवोदित कलाकारांना उत्तम व्यासपीठ मिळते. त्यातूनच उत्तम कलाकार जन्माला येतील याची खात्री आहे. एक कलासक्त ब्रांड म्हणून रांजेकर नेहमीच अशा उपक्रमांना पाठिंबा देत राहतील.
- अनिरुद्ध रांजेकर,
संचालक- रांजेकर रिअल्टी
‘सकाळ करंडक’ ही स्पर्धा राज्यभरातील विद्यार्थी कलाकारांसाठी उत्कृष्ट व्यासपीठ आहे. भविष्यातील कलाकार घडवण्याची ही जणू कार्यशाळाच आहे. यंदाही विद्यार्थ्यांनी या स्पर्धेला दिलेला भरघोस प्रतिसाद आणि रसिकांनी मोठ्या संख्येने स्पर्धेला उपस्थित राहत विद्यार्थ्यांना दिलेले प्रोत्साहन, हेच स्पर्धेचे खरे यश आहे.
- शिरीष देशपांडे,
मुख्य कार्यकारी अधिकारी- बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी