पुणे

सुश्राव्य कंठसंगीत अन् वाद्यसंगीताची पर्वणी

CD

पुणे, ता. ११ ः सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी रसिकांना सुश्राव्य कंठसंगीत अन् वाद्यसंगीताची पर्वणी मिळाली. या स्वरमंचावर प्रथमच सादरीकरण करत असलेल्या ह्रषिकेश बडवे आणि इंद्रायुध मजुमदार यांनी पूर्वार्ध रंगवला. विदुषी पद्मा देशपांडे यांच्या गायनानंतर जॉर्ज ब्रूक्स व पं. कृष्णमोहन भट यांचे अनोखे सॅक्सोफोन-सतार सहवादन, हा या दिवसाचा उत्कर्षबिंदू ठरला.
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात युवा गायक ह्रषिकेश बडवे यांच्या गायनाने झाली. सवाईच्या स्वरमंचावर त्यांनी प्रथमच सेवा रुजू केली. त्यांनी राग गावतीमध्ये ‘खबर सब की’ ही रचना सादर केली. त्याला जोडून ‘शान ए ताजमहल’ ही बंदिश त्यांनी रंगवली. त्यानंतर श्री कल्याण रागात ‘साहिब तुम करम करो’ आणि ‘सावरिया अब तो हम तुम संग’ या दोन बंदिशी प्रस्तुत केल्या. रसिकांच्या आग्रहास्तव ‘घेई छंद मकरंद’ या गाजलेल्या नाट्यपदाने त्यांनी सादरीकरणाची सांगता केली. त्यांना तबल्यावर प्रशांत पांडव, संवादिनीवर मिलिंद कुलकर्णी आणि तानपुऱ्यावर प्राजक्ता बडवे व वत्सल कपाळे यांनी साथसंगत केली.
दुसऱ्या सत्रात इंद्रायुध मजुमदार यांनी सरोदच्या स्वरांनी रसिकांची मने जिंकली. संगीतकलेचा समृद्ध वारसा लाभलेले इंद्रायुध हे विख्यात सरोदवादक पं. तेजेंद्र नारायण मजुमदार यांचे पुत्र आणि शिष्य. त्यांचेही हे ‘सवाई’मधील पहिलेच सादरीकरण होते. इंद्रायुध यांनी ‘राग श्री’मध्ये आलाप, जोड, झाला अशा क्रमाने वादन केले. राग मांज खमाजमधील उस्ताद अल्लाउद्दीन खाँसाहेब यांच्या दोन रचना पेश केल्या. तबलावादक ईशान घोष यांच्यासह रंगलेले त्यांचे सवाल-जवाब श्रवणीय आणि प्रेक्षणीय देखील होते. दिगंबर जाधव यांनी तानपुऱ्यावर साथ केली.
तिसऱ्या सत्रात विदुषी पद्मा देशपांडे यांच्या अनुभवसिद्ध गायकीची अनुभूती रसिकांनी घेतली. त्यांनी राग शामकल्याण प्रस्तुत केला. सोहनीबहार रागातील ‘नाथ देहो मोहे’ ही एकतालातील बंदिश त्यांनी सादर केली. ‘संगीत स्वयंवर’ या नाटकातील ‘करीन यदुमनी सदना’ या नाट्यपदाने त्यांनी प्रस्तुतीला विराम दिला. त्यांना तबल्यावर धनंजय खरवंडीकर, संवादिनीवर सुयोग कुंडलकर आणि श्रुती देशपांडे व सुनीता कुलकर्णी यांनी तानपुऱ्यावर साथ केली. आनंद देशमुख यांनी सूत्रसंचालन केले.
----
कलाकारांचे स्केच अन् अभिप्रायाचे पत्र
सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवावरील प्रेम रसिक विविध मार्गांनी व्यक्त करत असतात. अशाच दोन रसिकांच्या प्रेमाचा प्रत्यय गुरुवारी आला.
आनंद साठे यांनी महोत्सवाविषयीच्या आपल्या भावना पत्रातून व्यक्त केल्या. या महोत्सवात श्रोता म्हणून उपस्थित राहण्याचे त्यांचे हे तब्बल ४३ वे वर्ष आहे. महोत्सवात खास ठेवलेल्या पत्रपेटीत त्यांनी स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांना उद्देशून लिहिलेले पत्र टाकले. दरवर्षी एवढा मोठा संगीताचा सोहळा सातत्याने उभा करणे, हे काही सोपे काम नाही. पण तुमच्या पश्चात तुमची पुढची पिढी सुद्धा तितक्याच आत्मीयतेने हे काम करते आहे. काळाबरोबर पुढे आलेले, तरीही आपली सांगितीक परंपरा जपणारे हे महोत्सवाचे स्वरूप पाहायला तुम्ही असायला हवे होतात. पण संगीत रूपात तुम्ही येथे उपस्थित असल्याचे जाणवतेच, अशा भावना साठे यांनी या पत्रात व्यक्त केल्या आहेत.

मुग्धा कोंडे ही तरुणी पहिल्यांदाच या महोत्सवाला आली आहे. विधी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत असलेल्या मुग्धाला स्केचिंगची आवड आहे. त्यामुळे तिने महोत्सवातील सादरीकरणे ऐकतानाच हृषिकेश बडवे आणि इंद्रायुध मजुमदार यांची सुरेख रेखाचित्रे काढली.
----
हिशोब ताळेबंदाचा अन् सुरांचाही
युवा गायक हृषिकेश बडवे यांनी सवाईच्या स्वरमंचावरील पहिल्याच सादरीकरणात आपल्या आश्वासक आणि तयारीच्या गायकीची प्रचिती दिली. एकीकडे सनदी लेखापाल म्हणून ताळेबंदाचा हिशोब चोख सांभाळत असताना सुरांचे गणितही पक्के असल्याचे त्यांनी दर्शवले.

पं. भीमसेन जोशी यांची आठवण जागवताना ते म्हणाले, ‘‘मी पंडितजींचे आशीर्वाद घेण्यासाठी २००० मध्ये आलो होतो. तेव्हा मी ‘संगीत कट्यार काळजात घुसली’या नाटकात छोट्या सदाशिवची भूमिका करत असे. मी नमस्कार केल्यावर पंडितजींनी मला आशीर्वाद दिला. मला कौतुकाने मांडीवर बसवले आणि ‘दिन गेले
भजनाविण सारे’ या त्याच नाटकातील पदाच्या दोन ओळी गुणगुणल्या. मग चेष्टेने विचारले, ‘काय, बरोबर आहे का?’ आज त्यांनीच सुरू केलेल्या या महोत्सवात कला सादर करण्याची संधी मिळत असल्याचा आनंद वाटतो.’’

‘‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या स्वरमंचावरुन सादरीकरणाची संधी मिळणे, हे परमभाग्य आहे. सनदी लेखापाल आणि गायन अशा दोन्ही क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला ही संधी मिळणे विशेष वाटते.’’ अशी भावना बडवे यांनी व्यक्त केली.
----
आज (ता. १२) महोत्सवात ः
(वेळ दुपारी ४ ते रात्री १०)
सत्येंद्र सोलंकी - संतूरवादन
श्रीनिवास जोशी - गायन
उस्ताद शुजात हुसेन खाँ - सतारवादन
विदुषी डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे - गायन
फोटोः 75666, 75667, 25B16923, 16921, 16927

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI and Jobs : ‘एआय’ नोकऱ्या संपवणार? जाणून घ्या, ‘RBI’चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी काय दिलंय उत्तर

Year Ender 2025: हत्तींचं स्थलांतर, बिबट्यांची दहशत अन् कुत्र्यांचा वाद… 'हे' वर्ष वन्यजीवांसाठी इतकं हादरवणारं का ठरलं?

Kolhapur CPR : दोन हजारांत एमआरआय, ३५० रुपयांत सीटीस्कॅन; सीपीआरमधील सुविधेमुळे रुग्णांचा खर्च आणि वेळ वाचला

Year Ender 2025: लोकांनी वजन कमी करण्यापेक्षा हेल्दी राहण्यावर दिला भर; 'हे' ठरले 2025 चे 7 जबरदस्त फिटनेस ट्रेंड्स

Latest Marathi News Live Update: सातारा बामणोलीत ड्रग्ज छापा

SCROLL FOR NEXT