पुणे, ता. १२ ः विकास आराखड्यातील (डीपी) प्रत्येक रस्ता विकसित करण्याऐवजी पहिल्या टप्प्यात विकास आराखड्यातील १० रस्त्यांच्या विकासाला महापालिका प्रशासनाकडून प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी पुढील वर्षीच्या अंदाजपत्रकात स्वतंत्र आर्थिक तरतूद केली जाणार आहे.
महापालिकेमध्ये गावे समाविष्ट झाल्याने महापालिकेची हद्द मोठ्या प्रमाणात विस्तारली. त्या तुलनेत रस्त्यांची दुर्दशा मात्र कायम आहे. महापालिकेने जुन्या हद्दीच्या विकास आराखड्यामध्ये रस्ते प्रस्तावित केले असले तरीही, संबंधित रस्त्यांचा विकास महापालिकेने केलेला नाही. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या अद्याप कायम आहे. महापालिकेकडून उपलब्ध होणाऱ्या निधीवरच रस्त्यांच्या विकास करण्याचा प्रयत्न केला जात असल्याने रस्ते पूर्ण क्षमतेने विकसित होण्यास अडचण येते. या पार्श्वभूमीवर, महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी विकास आराखड्यातील १० रस्ते पहिल्या टप्प्यात विकसित करण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी आवश्यक आर्थिक तरतूद अंदाजपत्रकामध्ये केली जाणार आहे. दहा रस्त्यांमध्ये कात्रज, बाणेर, बालेवाडी, पाषाण या भागातील रस्त्यांचा समावेश आहे.
याबाबत आयुक्त नवल किशोर राम म्हणाले, ‘‘शहरातील विकास आराखड्यामधील प्रस्तावित असलेल्या रस्त्यांची कामे महापालिकेकडून केली जातात, मात्र निधीअभावी संबंधित कामे अपूर्ण राहतात. त्यामुळे आता विकास आराखड्यातील १० रस्त्यांची यादी महापालिकेने तयार केली आहे. संबंधित रस्ते पूर्णपणे विकसित केले जाणार. त्यासाठी विशेष निधी ठेवला जाईल. या रस्त्यांचा विकास झाल्यास वाहतुकीची समस्या सुटण्यास मदत होईल. त्याबाबतच्या सूचना पथ विभागास दिल्या आहेत.’’