पुणे, ता. २३ ः बोपोडी येथे महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करून संजय गांधी रुग्णालयाची इमारत बांधण्यात आली आहे, मात्र रुग्णालयासाठी आवश्यक यंत्रसामग्री, शस्त्रक्रिया विभाग, लिफ्ट यांसारखी कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. किरकोळ कामेदेखील पूर्ण करण्यास दिवसेंदिवस विलंब होत असून ही कामे केव्हा पूर्ण होणार आणि संबंधित रुग्णालय नागरिकांच्या सेवेत केव्हा येणार?, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
बोपोडी परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या अद्ययावत सोईसुविधा प्राप्त व्हाव्यात, यासाठी महापालिका प्रशासनाने बोपोडी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्यावर संजय गांधी रुग्णालय उभा करण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार महापालिकेने दोन वर्षांपूर्वी संबंधित रुग्णालयाच्या उभारणीस सुरुवात केली. महापालिकेच्या भवन विभागाकडून या रुग्णालयाची उभारणी करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यानुसार, भवन विभागाकडून रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण करण्यात आले. त्यानंतर, आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी इमारतीची पाहणी केली, रुग्णालयासाठी आवश्यक फर्निचर, यंत्रसामग्री, शस्त्रक्रिया विभाग, रुग्ण व नागरिकांसाठीची लिफ्ट व्यवस्था या स्वरूपाच्या आवश्यक कामांची यादी भवन विभागाकडे दिली असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तर, भवन विभागाने बांधकाम विषयक कामे पूर्ण झाल्याचे सांगितले आहे. त्यावरून महापालिकेच्या विभागांमध्येच समन्वयाचा अभाव असल्याचे उघड झाले आहे.
विभागांमधील समन्वयाच्या अभावामुळे संबंधित काम संथगतीने सुरू असल्याची सद्यःस्थिती आहे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर काही महिन्यातच उर्वरित कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे. असे असतानाही, या कामांसाठी विलंब सुरू असल्याची सद्यःस्थिती आहे. त्यामुळे उर्वरित कामे पूर्ण होऊन रुग्णालय लोकांच्या सेवेत केव्हा येणार? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तळमजल्यावर पार्किंगची व्यवस्था तर उर्वरित तीन मजल्यांवर एमआरआय स्कॅन, पॅथॉलॉजी रूम, ऑपरेशन थिएटर, वॉर्ड रूम, डॉक्टरांसाठीची रूम अशी रचना तीन मजल्यांवर असणार आहे.
मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची वाटचाल ‘पीपीपी’च्या मार्गावर
महापालिकेने संजय गांधी रुग्णालयासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. आणखी लाखो रुपये खर्च करून रुग्णालयाची कामे पूर्ण केली जाणार आहेत. हे रुग्णालय ‘मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल’ करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव आहे. या रुग्णालयामुळे सर्वसामान्य, गरीब, कष्टकरी नागरिकांना अल्पदरामध्ये चांगल्या व अद्ययावत सोईसुविधा मिळण्याची शक्यता आहे. मात्र महापालिका इतर रुग्णालयांप्रमाणेच संबंधित नवे रुग्णालयदेखील ‘पीपीपी’ तत्त्वावर खासगीकरणाचा घाट घालण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सर्वसामान्य, गरीब व कष्टकरी नागरिकांच्या खिशाला महापालिकेच्या नव्या रुग्णालयातही कात्री लागण्याची शक्यता आहे.
बोपोडीतील संजय गांधी रुग्णालयाच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले आहे. लिफ्ट, ऑपरेशन थिएटर, फर्निचर या स्वरूपाची काही कामे राहिली आहेत. किरकोळ कामांची यादी भवन विभागाकडे दिली आहे.''
- डॉ. नीना बोराडे, प्रमुख, आरोग्य विभाग, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.