पुणे, ता. २४ : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अंतर्गत विविध शैक्षणिक संस्थांमध्ये काम करणाऱ्या तीन हजार ५६२ कर्मचाऱ्यांची १२० कोटी ९० लाख १७ हजार २२९ रुपये भविष्य निर्वाह निधीची (पीएफ) रक्कम संस्थेने जमा केली नाही. मार्च २०१४ ते डिसेंबर २०१८ या कालावधीतील ही रक्कम येत्या दोन महिन्यांत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये जमा करावी. अन्यथा सोसायटीच्या मालमत्तेची जप्ती करण्यात येईल, असा आदेश प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्तांनी दिला आहे. तसेच, सोसायटीने खोटी कागदपत्रे सादर केल्याने त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदविण्याचाही आदेश त्यांनी दिला. पुण्याचे विभागीय भविष्य निर्वाह निधी आयुक्त अमित वशिष्ठ यांनी हा आदेश दिला आहे.
भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा न केल्याप्रकरणी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने अंमलबजावणी अधिकाऱ्यामार्फत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार भविष्य निर्वाह निधी विभागाने प्रकरणाची चौकशी केली. तसेच याबाबत सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या वतीने वित्त संचालक व इतरांचा व तक्रारदार कर्मचाऱ्यांचे जबाबही नोंदवले होते. दोन्ही बाजूंची साक्ष, युक्तिवाद, कागदोपत्री पुरावे पाहून आयुक्तांनी हा आदेश १७ डिसेंबर ला दिला.
दरम्यान, सोसायटीने ३ हजार ५६२ कर्मचारी हे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेतील परिच्छेद २ (फ) मधील व्याख्येनुसार योजनेतून ‘वगळलेले कर्मचारी’ ठरतात आणि त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणतेही योगदान भरणे कायदेशीररीत्या बंधनकारक नव्हते, असा युक्तिवाद केला. मात्र, कर्मचाऱ्यांच्या नोंदविण्यात आलेल्या जबाबावरून हे कर्मचारी त्यांच्या पूर्वीच्या नोकरीदरम्यान कर्मचारी भविष्य निर्वाह निधी योजनेचे सदस्य होते. त्यांनी तशी माहितीही संस्थेला दिली असून, त्यामुळे त्यांचे ‘ईपीएफ’ योजनेतील सदस्यत्व सिद्ध होते. योजनेतील परिच्छेद २६ अ नुसार त्यांचे सदस्यत्व सुरू ठेवणे बंधनकारक होते आणि त्यांना ‘वगळलेले कर्मचारी’ मानून योगदान थांबविण्याचा कोणताही आधार संबंधित आस्थापनेकडे नव्हता, असे आदेशात नमूद करत सोसायटीने केलेला आक्षेप फेटाळला. या प्रकरणात संबंधित ठोस व विश्वासार्ह पुरावे सोसायटीकडून सादर करण्यात आलेले नाहीत. उलट, या दाव्याच्या समर्थनार्थ सादर करण्यात आलेले फॉर्म स्पष्टपणे बनावट असल्याचे आढळून येते, असेही निरीक्षण नोंदविले आहे.
.....
कॅन्टीन कर्मचाऱ्यांचाही निधी भरा
सोसायटीने ३९४ कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी योगदानाची मार्च २०१४ ते डिसेंबर २०१८ या कालावधीतील ९१ लाख ८१ हजार ७९९ रुपये इतकी रक्कम जमा न केल्याचे आढळून आले होते. यावर सोसायटीने ते कर्मचारी हे संबंधित आस्थापनेचे नसून, कॅन्टीन सेवा चालविणाऱ्या ठेकेदारांचे कर्मचारी असल्याचा युक्तिवाद केला. मात्र, ठेकेदारांमार्फत नियुक्त करण्यात आलेले कर्मचारी हे कायद्यातील व्याख्येनुसार कर्मचारी ठरत नाहीत, असा दावा करण्याची वेळ आता निघून गेली आहे. हा कायदा केवळ थेट नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांनाच लागू होत नसून, अप्रत्यक्षपणे किंवा ठेकेदारांमार्फत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लागू होतो, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
...................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.