पुणे, ता. २६ ः पावसाने विश्रांती घेतलेली असतानाही शहराच्या वेगवेगळ्या भागांत अद्यापही गढूळ, दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे. पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्यामुळे शुद्ध पाण्यासाठी दररोजच पैसे खर्च करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. तर, समाविष्ट गावांमध्ये जलशुद्धीकरण केंद्रांचा अभाव असल्याने त्यांना कायमस्वरूपी गढूळ व दूषित पाण्यावर तहान भागवावी लागत असल्याची सद्यःस्थिती आहे.
मे महिन्यात पाण्याची टंचाई सुरू झाली असतानाच दरवर्षीच्या तुलनेत पावसाने लवकर हजेरी लावल्याने पाणी टंचाईचा प्रश्न मागे पडला. पाणी समस्या काही प्रमाणात दूर झालेली असली तरीही पिण्यायोग्य पाणी अद्यापही मिळत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. शहराच्या विविध भागांमध्ये नागरिकांना गढूळ, दूषित पाणी पुरवठा होत आहे. अनेक भागांत कमी दाबाने अर्धा तास पाणी उपलब्ध होते, त्यातही सुरवातीची १५ मिनीटे पाणी दूषित येते. त्यामुळे ते पाणी वाया जाते, तर उर्वरित १५ मिनिटांत मिळणारे पाणी कुटुंबाला पुरत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
अशी आहे स्थिती
- सूस रस्ता परिसरातील सोसायट्यांना मागील ४ ते ५ दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्यापूर्वी दूषित पाण्याला दुर्गंधी येत होती, आता दुर्गंधी कमी झालेली असली तरीही दूषित पाणी मिळण्याचे थांबलेले नाही. खराब पाण्याबाबत सदनिकाधारकांकडून गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी सुरू आहेत.
- हडपसर परिसरातील काळेपडळ, सय्यदनगर, ससाणेनगर, सातववाडी, गोंधळेनगर येथे खराब पाणी मिळत आहे. तात्पुरते काम केल्यामुळे प्रारंभी दूषित पाणी कमी झाले, मात्र काही दिवसानंतर पुन्हा दूषित पाणी मिळत असल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.
- विमाननगर परिसरातील नागरिकांवरही अनेकदा दूषित पाण्याचाच वापर करण्याची वेळ येते.
- केशवनगरच्या लोणकरनगरमधील तुलसी हॉटेलसमोरील परिसरातील नागरिकांना दररोजच दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी मिळत आहे. नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
- महापालिकेमध्ये ३२ गावे समाविष्ट होऊन अनेक वर्षे झाली. मात्र अजूनही संबंधित गावांमध्ये महापालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र नाहीत. त्यामुळे केवळ पावसाळाच नाही, तर वर्षातील बाराही महिने संबंधित गावांमधील नागरिकांना दूषितच पाण्यावर तहान भागवावी लागत आहे.
- महापालिका प्रशासन शुद्ध पाणी पुरवठा करणे तर दूरच, पण दूषित पाणीही आम्हाला वेळेवर देत नाही, असा आरोप समाविष्ट गावांमधील रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
सांडपाणी वाहिन्या व जलवाहिन्या
पाऊस झाल्यानंतर एक ते दोन दिवस गढूळ पाणी पुरवठा होतो. महापालिकेकडून त्याबाबत पाणी उकळून व गाळून पिण्याचे आवाहनही केले जाते. त्यास नागरिकांकडून प्रतिसादही दिला जातो. मात्र पावसाने विश्रांती घेतल्यानंतरही गढूळ, दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विशेषतः अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्या व जलवाहिन्या फुटण्यामुळे सांडपाणी जलवाहिनीमध्ये मिश्रित होतात. त्यामुळे नागरिकांना दूषित व दुर्गंधी येत असलेले पाणी मिळत आहे. केशवनगरच्या लोणकरनगरमधील नागरिक मागील एक महिन्यापासून या समस्येने त्रस्त आहेत. हीच परिस्थिती हडपसरमधील सातववाडी, गोंधळेनगर परिसरामध्येही आहे.
महापालिकेकडून उपाययोजना
पावसाळ्यात जलशुद्धीकरण केंद्रांवर गढूळ पाणी येते. त्यावर महापालिकेकडून एक एमएलडी पाण्यासाठी १० किलो पीएसी लिक्विडचा वापर केला जातो. पाण्याची गढूळता जास्त असेल, तर त्याच्यानुसार पीएसीचा पाण्यामध्ये वापर केला जातो. पाणी शुद्ध झाल्यानंतर त्याचा पुरवठा केला जात असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
आम्हाला मागील ४ ते ५ दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. त्यापूर्वी पाण्याला दुर्गंधी येत होती. सदनिकाधारकांनी आमच्याकडे तक्रारी केल्या. पावसाळा असल्यामुळे दूषित पाणी मिळत असेल, म्हणून आम्ही महापालिका प्रशासनाकडे अद्याप तक्रार केलेली नाही.
- हरीश पाटील, सूस रस्ता
पावसामुळे गढूळ पाणी आल्यास त्यावर प्रक्रिया केल्यानंतर शुद्ध पाणी पुरवठा केला जातो. मात्र सांडपाणी वाहिनी व जलवाहिन्यांचे पाणी मिश्रित होत असल्यास संबंधित वाहिन्यांची तपासणी करून वाहिन्यांची नियमितपणे दुरुस्ती केली जाते.
- प्रसन्नराघव जोशी, अधीक्षक अभियंता, पाणी पुरवठा विभाग, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.