महाविद्यालयीन टेनिस स्पर्धेत
सांगोला महाविद्यालयास तृतीय
.........
सांगोला, ता. २८ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन टेबल टेनिस स्पर्धेचा समारोप बार्शी येथील कॉलेज ऑफ एज्युकेशनमध्ये नुकताच उत्साहात पार पडला. या स्पर्धेत सांगोला महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले.
या स्पर्धेत विद्यापीठाशी संलग्न विविध महाविद्यालयांतील संघांनी सहभाग नोंदविला होता. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची विद्यापीठ संघात निवड करण्यात येणार असून, त्यांना राज्यस्तरीय स्पर्धेत विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाबूरावजी गायकवाड, सचिव अॅड. उदय (बापू) घोंगडे तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी महाविद्यालयीन संघाचे अभिनंदन केले. प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले व क्रीडाशिक्षक प्रा. जगदीश चेडे यांनीही संघाचे विशेष कौतुक करत खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापकवर्ग, क्रीडा समितीचे सदस्य, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.