सुपे, ता, २६ : कुतवळवाडी-बोरकरवाडी (ता. बारामती) येथील विविध विकासकामांची जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून मार्गदर्शन केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत गाव व परिसरात विविध विकास कामे येथील ग्रामपंचायत व गावकऱ्यांनी केली आहेत. या कामांची पाहणी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने, विस्तार अधिकारी भीमराव भागवत यांनी नुकतीच केली. दरम्यान, शेतकरी दिनाचे औचित्य साधून येथील ग्रामस्थांनी या अधिकाऱ्यांना बैलगाडीत बसवून मिरवणूक काढून स्वागत केले.
शाळेतील विज्ञान प्रदर्शन, सीसीटीव्ही कॅमेरे, पाणी संकलन, सोलर, परसबाग, शौचालय, अंगणवाडी व अन्य उपक्रमांची पाहणी केली. बचतगटातील महिलांना धनादेश वाटप, एकल महिला अश्विनी बोरकर यांचे प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत घरकुल प्रवेश, ओला-सुका कचऱ्यासाठी कचराकुंडी वाटप, आयुष्यमान भारत कार्डचे वाटप, क्यूआर कोडद्वारे घरपट्टी भरणा आदी कामांची माहिती या अधिकाऱ्यांनी घेतल्याची माहिती सरपंच रूपाली भोसले यांनी दिली. याप्रसंगी ग्रामपंचायतीचे सदस्य, विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.