अरविंद पवार माध्यमिक विद्यालयास सर्वसाधारण विजेतेपद
वाईत जनता शिक्षण संस्थेच्या क्रीडा स्पर्धा उत्साहात; खानापूर विद्यालयास उपविजेतेपद
वाई, ता. २७ : जनता शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालय विभागाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा किसन वीर महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर उत्साहात झाल्या. या स्पर्धांमध्ये वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारात विद्यार्थ्यांनी क्रीडा नैपुण्य सादर केले. या वेळी सर्वसाधारण विजेतेपद अरविंद पवार (पाटील) माध्यमिक विद्यालयाने, तर उपविजेतेपद खानापूर माध्यमिक विद्यालयाने पटकाविले.
या स्पर्धांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी (शिक्षण विभाग) देवकुमार यादव यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थेचे सचिव डॉ. जयवंत चौधरी, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, माउंट एव्हरेस्टवीर राहुल येलगे आदी उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष (कै.) किसन तथा आबासाहेब वीर, माजी अध्यक्ष (कै.) प्रतापराव भोसले आणि (कै.) तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. या वेळी विद्यार्थ्यांनी संगीतसह संचलन करून मान्यवरांना मानवंदना दिली. देवकुमार यादव यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात खेळाचे महत्त्व अधोरेखित केले. डॉ. चौधरी यांनी महाविद्यालयाच्या १९६२ पासूनच्या प्रवासाचा आढावा घेऊन विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत क्रीडा स्पर्धांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. या स्पर्धांचे बक्षीस वितरण संस्थेचे अध्यक्ष मदन भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि नूतन नगराध्यक्ष अनिल सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी उपाध्यक्ष शंकरराव गाढवे, डॉ. जयवंत चौधरी, नारायण चौधरी, संचालक केशवराव पाडळे, सुरेश यादव, सुनील शिंदे, प्राचार्य डॉ. गुरुनाथ फगरे, नगरसेविका अपर्णा जमदाडे, प्रसाद बनकर, पद्मा जाधव, ज्योती गांधी, डॉ. जागृती पोरे, विजय ढेकाणे, संग्राम सपकाळ, दीपाली सावंत, नूतन मालुसरे, केतकी पाटणे-मोरे यांची उपस्थिती होती. या वेळी वैयक्तिक आणि सांघिक प्रकारात यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या वेळी श्री. सावंत यांनी खेळामुळे संयम, अचूक निर्णयक्षमता आणि खिलाडूवृत्ती विकसित होते. त्याचा उपयोग सामाजिक आणि व्यावसायिक जीवनात होतो, असे सांगितले.
मदन भोसले यांनी संस्थेच्या माध्यमातून गरीब व होतकरू खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे सांगितले. क्रीडा शिक्षक गणपत जाधव यांनी सूत्रसंचालन केले. खानापूर विद्यालयाचे मुख्याध्यापक महेंद्र भोसले यांनी प्रास्ताविक केले. न्यू इंग्लिश स्कूल व्याजवाडीचे मुख्याध्यापक संजय वाईकर यांनी परिचय करून दिला. वेळे विद्यालयाचे मुख्याध्यापक मनोहर शिंदे यांनी आभार मानले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी किसन वीर महाविद्यालयाचे क्रीडा व एनसीसी विभागप्रमुख कॅप्टन डॉ. समीर पवार, यशवंत जमदाडे, संदीप कदम, जितेंद्र चव्हाण, क्रीडा शिक्षक सचिन चव्हाण, दत्ता काळे आणि सर्व शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडा व शिक्षक, शिक्षकेतर सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
----
25B07400
वाई : जनता शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागाच्या क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी नगराध्यक्ष अनिल सावंत, अध्यक्ष मदन भोसले व मान्यवर.