घोरपडी, ता. २७ : कॅम्प परिसरातील गुरुद्वारा गुरुनानक दरबार, गुरुनानक यूथ फाउंडेशन आणि पुण्यातील ‘साथसंगत’च्या सहकार्याने श्री गुरू तेग बहादूर आणि शिखांचे दहावे गुरू गोविंद सिंह यांच्या चार साहिबजादांचे (मुलांचे) हौतात्म्य व बलिदानाचे स्मरण करण्यासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या ‘सफर-ए-शहादत’ या दुचाकी रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये सर्व वयोगटांतील नागरिक सहभागी झाले होते.
सहपोलिस आयुक्त रंजन कुमार शर्मा यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सकाळी साडेनऊ वाजता रॅलीला कॅम्प येथील गुरुद्वारा येथून सुरुवात झाली. दुचाकी रॅली पुण्याच्या रस्त्यांवरून जात असताना विविध मंडळे, मंदिरे आणि संस्थांनी रॅलीवर पुष्पवृष्टी करून आदराने स्वागत केले. यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, इस्कॉनचे भक्त, साधू वासवानी मिशन व गुरुद्वारा सिंग सभा यांचा सहभाग होता. याशिवाय, इतर अनेक संस्थांनी अल्पोपाहार देऊन रॅलीचे स्वागत केले. साधारण सकाळी साडेअकरा वाजता कॅम्प येथील गुरुद्वारा येथे रॅलीची सांगता करण्यात आली. या वेळी रॅलीमध्ये सहभागी झालेल्या मुलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.