मार्केट यार्ड, ता. ५ ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीत काही अडत्यांकडून नियमांना फाटा देत रस्त्यातच शेतमालाची विक्री सुरू केली आहे. गाळे रिकामे ठेवून थेट रस्त्यांच्या मधोमध वाहने उभी करून शेतमालाची विक्री चालवली आहे. परिणामी रविवारी मार्केट यार्ड परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. शेतकरी आणि खरेदीदार या दोघांनाही मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला. मात्र, बाजार समिती प्रशासनाने या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे बोलले जात आहे.
समितीच्या नियमानुसार शेतमाल गाळ्यावर उतरवूनच विक्री करणे आवश्यक आहे. गाळ्यासमोरील १५ फुटांच्या पांढऱ्या पट्ट्यांमध्येच जास्तीच्या आवकेसाठी विक्रीस परवानगी आहे. परंतु काही ‘माननीयां’च्या जवळील अडत्यांकडून या नियमांची पायमल्ली होत आहे. गाळ्यांच्या दोन पाकळ्यांमधील रस्त्यावरच वाहने उभी करून माल विक्री सुरू ठेवण्याचा प्रकार आता नियमित झाला आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होत असून शेतमाल वेळेत विक्री न होणे, गुणवत्तेत घट येणे आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. रविवारी केवळ ९० ट्रक आवक झाली असतानाही संपूर्ण बाजार परिसर ठप्प झाला होता.
या बेकायदेशीर विक्रीमागे ‘डमी अडत्यां’मार्फत होणारे अर्थपूर्ण संबंध आणि प्रशासनाचा आशीर्वाद असल्याची चर्चा पूर्वीपासूनच होती. सध्याच्या परिस्थितीने त्यावर शिक्कामोर्तब होत असल्याची चर्चा आहे. हा प्रकार उघडपणे सुरू असतानाही सचिव, विभागप्रमुख आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून कोणतीही कारवाई केली जात नसल्याने बाजार घटकांत संताप आहे. शिस्तभंग करणाऱ्या अडत्यांवर तातडीने कारवाई न झाल्यास बाजार परिसरातील कोंडी आणि अव्यवस्था अधिक वाढेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
--------
‘‘गाळा मोकळा ठेवून, समोरील मोकळ्या जागेत विक्री करणाऱ्या आणि १५ फुटाच्या बाहेर मालाची विक्री करणाऱ्या आडत्यांवर कडक कारवाई केली जाईल.
डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे बाजार समिती
-------------------
मार्केट यार्ड : बाजारात रस्त्यात ‘दुकानदारी’ सुरू असल्याने रविवारी झालेली वाहतूक कोंडी.
फोटो ः 05826