पुणे : महापालिकेत येण्यापूर्वी ग्रामपंचायतीकडून सोसायट्यांमधील कचरा उचलला जात होता. परंतु महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून कचरा उचलण्यासाठी महापालिकेची गाडीच येत नाही. महापालिकेकडून वेळेत नियमित कचरा उचलला जाईल, अशी अपेक्षा होती. महापालिकेला साध्या कचऱ्याच्या गाड्या पुरवता येत नाहीत. कचऱ्यासाठी नाइलाजास्तव एखाद्या खासगी संस्थेला महिन्याला आठ हजार रुपये द्यावे लागत असतील, तर महापालिकेला कर कशासाठी भरायचा, हा प्रातिनिधिक सवाल आहे, पिसोळी गावातील कांचन ओनेक्स सोसायटीचे अध्यक्ष किशोर ढमढेरे यांचा.
या संदर्भात महापालिका आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्तांनी दखल घ्यावी. नवीन समाविष्ट गावांमध्ये महापालिकेकडून कचरा व्यवस्थापनासोबतच पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधाही उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पिसोळी गावातील रहिवाशांनी केली आहे. महापालिकेत समाविष्ट झालेल्या नऱ्हे गावातही महापालिकेकडून कचरा उचलला जात नव्हता. पैसे दिल्याशिवाय कचरा उचलला जाणार नाही, असे कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात असल्याची तक्रार नऱ्हे गावातील नागरिकांनी आयुक्तांकडे केली होती. आयुक्तांनी त्याची दखल घेत कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पिसोळीचे माजी सरपंच नवनाथ मासाळ म्हणाले, की महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून सोसायट्यांमधील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. पिण्याचे पाणी आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. कचऱ्याचा प्रश्न लवकर मार्गी न लावल्यास पालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल.
नागरिकांच्या तक्रारी...
महापालिकेत समाविष्ट झाल्यापासून ग्रामपंचायतीकडून कचरा उचलणे बंद
नव्याने समाविष्ट गावांच्या सोसायट्यांमधील कचरा उचलण्यासाठी महापालिकेने यंत्रणा उभारलेली नाही
सोसायटीमध्ये कचऱ्याची गाडी येत नसल्यामुळे कचऱ्याचे ढीग
आरोग्याचा प्रश्नही निर्माण
सोसायट्यांना नाइलाजाने खासगी संस्थेमार्फत कचरा उचलावा लागतो
सोसायटीला किमान पाच ते आठ हजार रुपये मोजावे लागतात
परिणामी सोसायट्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो
"महापालिकेकडून बहुतांश समाविष्ट गावांमधील कचरा उचलला जात आहे. महापालिकेने कचरा उचलण्यासाठी खासगी संस्थेला परवानगी दिलेली नाही. महापालिकेकडून सोसायट्यांमधील कचरा उचलला जात नसल्यास त्याची माहिती घेण्यात येईल, तसेच महापालिकेकडून आवश्यक यंत्रणा उभारण्यात येईल."
- डॉ. कुणाल खेमनार, अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.