Samir Dombe Sakal
पुणे

Pune: शेतीसाठी बक्कळ पगाराच्या नोकरीकडे फिरवली पाठ; आज करतोय कोट्यवधीची उलाढाल

एका मोठ्या कंपनीतील उच्चपदस्थ नोकरीला अवघ्या दीड वर्षात रामराम करत कृषी प्रक्रिया उद्योगात उतरलेल्या ३१ वर्षीय यांत्रिक अभियंता (मेकॅनिकल इंजिनिअर) तरुणाने गरुडझेप घेतली.

सकाळ वृत्तसेवा

एका मोठ्या कंपनीतील उच्चपदस्थ नोकरीला अवघ्या दीड वर्षात रामराम करत कृषी प्रक्रिया उद्योगात उतरलेल्या ३१ वर्षीय यांत्रिक अभियंता (मेकॅनिकल इंजिनिअर) तरुणाने गरुडझेप घेतली.

पुणे - पिंपरी-चिंचवडमधील एका मोठ्या कंपनीतील उच्चपदस्थ नोकरीला अवघ्या दीड वर्षात रामराम करत कृषी प्रक्रिया उद्योगात उतरलेल्या ३१ वर्षीय यांत्रिक अभियंता (मेकॅनिकल इंजिनिअर) तरुणाने अंजीर उत्पादन आणि प्रक्रिया उद्योगात गरुडझेप घेतली आहे. अगदी पंचविशीत असताना शेतकरी उत्पादन कंपनी स्थापन केली आणि या कंपनीच्या माध्यमातून गावातील शेतकऱ्यांना एकत्रित आणत अंजीर शेतीतून वार्षिक सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या उलाढालीची किमया केली आहे. समीर मोहनराव डोंबे असे या अभियंता तरुणाचे नाव आहे. ते दौंड तालुक्यातील खोर येथील रहिवासी आहेत.

शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्यामागे त्यांनी अंजीर फळांच्या उत्पादनात वाढ करणे, त्यांची विक्री करणे आणि अंजीर फळांवर प्रक्रिया करून त्यातून उपपदार्थ तयार करणे, असा हेतू ठेवला आहे. या कंपनीला ‘पवित्रक’ असे नाव देण्यात आले आहे. अंजीर फळाला संस्कृतमध्ये पवित्रक म्हटले जाते. त्यामुळे त्यांनी या कंपनीला अंजीर फळाचेच संस्कृत भाषेतील नाव दिले आहे. समीर यांचे वडील मोहनराव डोंबे हे पेशाने शिक्षक. ते तेथील माध्यमिक शाळेत अध्यापनाचे काम करत करत, शेतीही करतात.

समीर यांनी खोर येथील जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण झाल्यानंतर गावातीलच सरस्वती माध्यमिक विद्यालयात माध्यमिक शिक्षण, पुणे शहरातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. बारावीनंतर हडपसर येथील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेतून यांत्रिक अभियांत्रिकीचा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग) पदविका पूर्ण केली. त्यानंतर बिबवेवाडी येथील विश्‍वकर्मा इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली. या पदवीनंतर त्यांना पिंपरी-चिंचवड येथील जीकेएल सिंटर मेटल्स या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागली. परंतु या नोकरीत ते फार काळ रमले नाहीत. उणेपुरे अवघ्या दीड वर्षाच्या सेवेनंतर ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. ही नोकरी सोडल्यानंतर अंजीर शेतीबरोबरच अंजीर प्रक्रिया उद्योगात उतरण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि तो प्रत्यक्षात आणला.

उपपदार्थांचीही निर्मिती

कंपनी स्थापन करत अंजीर फळांवर प्रक्रिया करून त्यातून अंजीर जेली, जॅम आदी उपपदार्थांची निमिर्ती करण्यास सुरवात केली. या उपपदार्थांनाही पवित्रक हेच नाव देण्यात आले आहे. अंजीर जेली आणि जॅमचे चार प्रकार आहेत. यात साधा (प्लेन), मध, केशर आणि विलायची पावडरपासून तयार केलेल्या प्रकारांचा समावेश आहे. या शेतकरी उत्पादक कंपनीची पहिल्या वर्षीची उलाढाल ही केवळ १५ लाख रुपयांची होती, असे समीर यांनी सांगितले.

कंपनीत १५० शेतकऱ्यांचा सहभाग

सद्यःस्थितीत दौंड तालुक्यातील खोर येथील सुमारे १५० शेतकऱ्यांनी मिळून ४०० हेक्टर क्षेत्रावर अंजीर लागवड केलेली आहे. हे सर्व शेतकरी ‘पवित्रक’ कंपनीत सहभागी होत आहेत. यापैकी ३० ते २५ शेतकरी हे हंगामी स्वरूपात, तर यापैकी ९० ते ९५ शेतकरी कायमस्वरूपी या शेतकरी कंपनीत सहभागी आहेत.

नोकरी करण्याच्या उद्देशाने मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली, त्यानुसार एका कंपनीत दीड वर्ष नोकरीही केली. नोकरीत येण्यापूर्वीपासून म्हणजेच २०१० पासून शेती करत होतो. नोकरीपेक्षा शेतीत नवनवे प्रयोग करण्याचा विचार होता. तो विचार अंजीर शेतीच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्यात यश आले, याचे समाधान आहे. भविष्यात अन्य शेतकऱ्यांनाही याचा फायदा व्हावा, या उद्देशाने काम करत आहे.

- समीर डोंबे, मालक, पवित्रक शेतकरी उत्पादक कंपनी

महानगरांमध्ये विक्रीचे जाळे

संपूर्ण देशभरातून या कंपनीच्या अंजीर फळांना आणि फळांपासून तयार केलेल्या उपपदार्थांना मोठी मागणी आहे. त्यामुळे देशातील नामवंत विक्री कंपन्यांच्या माध्यमातून या उपपदार्थांची विक्री केली जात आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांसह देशातील सर्व महानगरांमध्ये (उदा. नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू) विक्रीची व्यवस्था निर्माण केली आहे.

शेती क्षेत्रातील योगदानाबद्दल मिळालेले पुरस्कार

  • बाबू जगजीवनराम अभिनव किसान पुरस्कार

  • स्वच्छता इनिशिएटिव्ह पुरस्कार

  • प्रगतिशील शेतकरी पुरस्कार

  • वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

  • उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार

  • अंजीररत्न पुरस्कार

  • कृषिभूषण डॉ. अप्पासाहेब पवार कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार

  • युवा सन्मान इनोव्हेटिव्ह यंग ॲग्रो आंत्रप्रेन्युअर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jack Dorsey's New App : खुशखबर! आता इंटरनेट नसलं तरी करता येणार चॅटिंग; जॅक डोर्सीच 'हे' अ‍ॅप घेणार व्हॉट्सअ‍ॅपची जागा, तुम्ही पाहिलंत का?

Mumbai News: एमएसआरटीसीच्या दररोजच्या फेऱ्यात घट, कर्मचाऱ्यांना त्रास; दररोज लेटमार्कने हैराण

Latest Maharashtra News Updates : आमदार धसांच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू

Jalgaon News : जळगाव एमआयडीसीत आकाशातून कोसळला लोखंडी तुकडा? चौकशीत उलगडा

Suresh Dhas: सुरेश धसांच्या सुपुत्राचा कारनामा! भरधाव कारने दुचाकीला उडवले, एकाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT