माले (पुणे) : मुळशी तालुक्याच्या दुर्गम भागातील तैलबैला येथे सर्पदंश झालेल्या आदिवासी तरुणाचे प्राण वाचविण्यासाठी गावातील तरुणांनी तन, मन आणि धनाने मदत केली. त्याच्या उपचारासाठी सोशल मिडियावर आवाहन केले. त्यामुळे या आदिवासी तरुणाचे प्राण वाचले.
तैलबैला हे त्याच्या कातळ दगडी भिंतीसाठी व प्रस्तराराहेणासाठी प्रसिद्ध आहे. मुळशी तालुक्यातील अत्यंत दुर्गम भागात हे गाव आहे. येथे मोबाईलला रेंज मिळत नाही. अशा दुर्गम परिसरात आदिवासींची वस्ती आहे. येथील शिवा पवार (वय ३४) हा अल्पशिक्षीत आदिवासी तरुण जंगलातून करवंदे गोळा करणे, लोकांच्या शेतात मजुरी करणे, आदी मिळेल ती कामे करुन चार लहान मुलांसह कुटुंबाचा उदर निर्वाह करतो. १४ जून रोजी रात्री जंगलातून घरी येत असताना त्याला पायाला काहीतरी टोचले. अंधार असल्यामुळे त्याला काय होते, ते दिसले नाही. तो घरी झोपी गेला. मात्र, पहाटे त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्याचा पाय सुजला होता व तो बेशुध्द झाला. तेव्हा हा सर्पदंशाचा प्रकार असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले.
ग्रामस्थांनी परिस्थिती लक्षात घेऊन तातडीने हालचाली सुरु केल्या. गावातील एक गाडी बघून त्याला लोणावळा येथील एका खासगी दवाखान्यात नेले. परंतु, त्याची अवस्था बघून त्यांनी दुसरीकडे नेण्यास सांगितले. त्यामुळे युवकांनी तळेगाव (ता. मावळ) येथील तळेगाव जनरल हॉपिटलमध्ये नेले. तेथे त्याच्यावर प्रथमोपचार सुरु करण्यात आले.
डॉक्टरांनी सर्पदंश हा मोफत किंवा सवलतीच्या दरात बसत नाही व सुमारे पन्नास ते साठ हजार खर्च येईल, असे सांगितले. हातावर पोट असणारा आदिवासी कातकरी एवढे पैसे कुठून आणणार, असा विचार युवकांनी केला. मात्र, गावातीलच आपला सहकारी वाचला पाहिजे, या हेतूने त्यांनी त्यांचे प्रयत्न सुरु केले. गावातील भैरवनाथ प्रतिष्ठान, जय हनुमान मंडळ, स्थानिक युवक यांनी वर्गणी काढली. ती कमी पडत असल्याने व्हॉटसअॅप ग्रुप, फेसबुकवर मदतीचे आवाहन केले. दोन हजार, एक हजार, पाचशे, अशी मदत मिळत गेली. तीन चार दिवसांत पन्नास हजार रुपयांची मदत जमा झाली.
या सर्व धावपळीत भैरवनाथ दुर्गेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक रमेश मेणे, शिवसेनेचे धरण विभाग प्रसिद्धीप्रमुख वसंत बोडके यांनी पुढाकार घेतला. दवाखान्यात नेण्यासाठी हरिश्चंद्र मेणे, नवनाथ मेणे, पांडुरंग गवारी यांनी वाहन उपलब्ध करुन दिले. गावचे पोलिस पाटील गणेश मेणे, उपसरपंच संजय गोरे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब वायकर, सुनील बोडके यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्याकडे प्रयत्न केले. आमदार शेळके यांनी व रवींद्र मालपोटे यांनी डॉक्टरांना शिवा याची आर्थिक परिस्थिती सांगून बिलात सवलत मिळवून दिली. पस्तीस हजार बिल अदा करण्यात आले. बरा झाल्यानंतर त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. युवकांनी तळमळीने केलेल्या प्रयत्नांमुळे त्याचे प्राण वाचले.
रुग्णालयाच्या बील पस्तीस हजार रुपये खर्च आले. जमा झालेल्या रकमेतून ते देण्यात आले. उरलेली रक्कम अशा तातडीच्या प्रसंगी गरजू आदिवासी बांधवांसाठी वापरणार आहोत. स्थानिक युवक, सोशल मिडियाच्या माध्यमातून लोकांनी वेळ व आर्थिक मदत देऊन केलेल्या प्रयत्नांमुळे एका कातकरी युवकाचे प्राण वाचू शकले, असे भैरवनाथ दुर्गेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक रमेश मेणे यांनी सांगितले.
ना डॉक्टर ना रुग्णवाहिका
सरकारने भांबर्डे व आजुबाजुच्या दुर्गम परिसरासाठी १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका ठेवली होती. परंतु, दुरुस्ती, रेंज नाही व कोरोनामुळे इतर ठिकाणी अधिक गरज असल्याने ती इतरत्र नेण्यात आली. या दरम्यान परिसरातील संजय पवार, लहु मोरे व शिवा यांना सर्पदंश झाला. रुग्णवाहिका नसल्याने ज्यांना शक्य होते त्यांनी खासगी वाहनांतून रुग्णालय गाठले. परंतु, शिवासारख्या आदिवासी, गरिबांनी काय करायचे, असा प्रश्न आहे. त्यामुळे रुग्णवाहिका तातडीने पुन्हा भांबर्डे येथे उपलब्ध ठेवावी. दोन वर्षांपासून भांबर्डे उपकेंद्रात डॉक्टर, नर्स नाहीत, ते उपलब्ध करुन द्यावेस अशी मागणी भांबर्डे गावचे सरपंच सुनील वायकर व पप्पू सरुसे यांनी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.