28 lakh women invested various schemes of mutual funds last three years
28 lakh women invested various schemes of mutual funds last three years sakal
Personal Finance

महिलांची आगेकूच

सुहास राजदेरकर

म्युच्युअल फंडांमध्ये आज एकूण ७५ लाख महिला गुंतवणूकदार आहेत

मागील तीन वर्षांत तब्बल २८ लाख महिलांनी म्युच्युअल फंडांच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक केली आहे. म्युच्युअल फंडांमध्ये आज एकूण ७५ लाख महिला गुंतवणूकदार आहेत. देशामध्ये आज ४२ म्युच्युअल फंड्स, ४० लाख कोटी मालमत्ता आणि एकूण १४ कोटी गुंतवणूकदार आहेत.

परंतु, एका गुंतवणूकदाराचे साधारण चार फोलिओ धरले आणि एका पॅन क्रमांकाप्रमाणे गणना केली, तर ही संख्या कमी होऊन फक्त ३.५ कोटी होईल. अर्थात, एकूण म्युच्युअल फंड गुंतवणूकदार ३.५ कोटी आणि त्यामध्ये महिलांचे प्रमाण ७५ लाख म्हणजेच २२ टक्के आहे.

गुंतवणुकीमध्ये महिलेचे नाव पहिले ठेवण्यामागील ‘बोलविता धनी’ आणि कारणे वेगळी असतात असे गृहीत धरले, तरीही महिला गुंतवणूकदारांच्या नावे ती गुंतवणूक आहे आणि त्यांचा सहभाग वाढतो आहे हे, कोणी नाकारू शकत नाही.

तरुणाईचा वाढता कल

म्युच्युअल फंड गुंतवणूकदार असलेल्या ७५ लाख महिलांपैकी साधारणपणे २८.५० लाख महिला या ४५ वर्षे आणि त्यावरील वयाच्या आहेत. परंतु, असे दिसते की १८ ते २४ वर्षे वयोगटातील महिला,

म्युच्युअल फंड गुंतवणुकीकडे जास्त आकर्षित होत आहेत. कारण मागील तीन वर्षांत त्यांची संख्या ६६ हजारांवरून तीन लाख झाली, अर्थात चौपट वाढली. त्याचप्रमाणे मागील तीन वर्षांत, २५ ते ३५ वर्षे वयोगटातील महिला गुंतवणूकदारांची संख्या ८.६ लाखावरून २० लाखांवर पोहोचली, अर्थात दुपटीपेक्षा जास्त वाढली.

छोट्या शहरांमध्येही प्रसार

मागील तीन वर्षांत, टॉप ३० शहरांमध्ये महिला गुंतवणूकदारांची संख्या २८ लाखांवरून ४२ लाख झाली, म्हणजेच ५० टक्के वाढ. परंतु, ‘बी-३०’ शहरांमधील (टॉप ३० पुढील, ज्याला ‘बियॉंड टॉप ३०’ असे म्हणतात), गुंतवणूकदारांची संख्या १९ लाखांवरून ३२ लाख झाली, म्हणजेच ७२ टक्के वाढ. सोबतच्या तक्त्यामधील आकडे हेच दर्शवितात,

की ‘टॉप १००’ शहरांच्या पुढील निमशहरे, गाव-खेड्यांमधील म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची संख्या मोठ्याप्रमाणात वाढते आहे. सर्वांत उल्लेखनीय बाब म्हणजे, शेअर बाजार घसरतो तेव्हा या छोट्या शहरांमधील गुंतवणूक वाढते. यापूर्वी उतरत्या शेअर बाजारामध्ये गुंतवणूकदार गुंतवणूक काढून घ्यायचे, त्यामुळे त्यांना तोटा व्हायचा.

शहरे - जून २०१४ - मार्च २०२० - मार्च २०२३

टॉप ५ शहरे ७३ - ६२ - ५४

पुढील १० शहरे १२ - १३ - १३

पुढील २० शहरे ६ - ६ - ५

पुढील ७५ शहरे ५ - ५ - ६

वरील ११० शहरांच्या पुढील ४ - ११ - १७

परदेशी गुंतवणूकदार - - ३ - ३

कारणे

१ भारतीय शेअर बाजाराविषयी वाढणारा विश्वास.

२ थोडी जोखीम पत्करून जास्त परतावा मिळविण्याची वाढती मानसिकता.

३ लहान गुंतवणूकदारांचा ‘सेबी’ तसेच ॲम्फीवरील वाढणारा विश्वास.

४ दिवसेंदिवस वाढणारी एसआयपी सुविधेची लोकप्रियता.

सल्लागार किंवा एजंट्सवर विश्‍वास

असेही दिसते, की महिला गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंड सल्लागार किंवा एजंट्सवर जास्त विश्वास आहे. कारण महिलांनी तब्बल सहा लाख १३ हजार कोटी रुपये हे मध्यस्थांमार्फत म्युच्युअल फंडांमध्ये गुंतविले आहेत, तर फक्त एक लाख ४२ हजार कोटी रुपये हे थेट आले आहेत.

वाटचाल १०० लाख कोटींकडे

असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया, अर्थात ॲम्फीच्या, अहवालानुसार कोविड काळामध्ये महिला गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात म्युच्युअल फंडांकडे वळल्या. महिला तसेच इतर छोट्या गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडांवरील विश्वास असाच वाढत राहिला, तर म्युच्युअल फंड उद्योगाचे तसेच सरकारचे, म्युच्युअल फंडांची एकूण मालमत्ता १०० लाख कोटींवर नेण्याचे स्वप्न पुढील पाच वर्षात सहज शक्य होईल, अशी आशा करायला हरकत नाही.

(लेखक ‘ए३एस’ फायनान्शिअल सोल्यूशन्सचे प्रवर्तक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: अजित पवार अन् शरद पवार लग्न सोहळ्यानिमित्त एकत्र

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

SCROLL FOR NEXT