Bhondala
Bhondala sakal
संपादकीय

सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणारा भोंडला

सकाळ वृत्तसेवा

- अपर्णा पाटील-महाशब्दे

अनादी काळापासून चालत आलेल्या भारतीय संस्कृतीने ‘आ नो भद्रा क्रतवो यन्तू विश्वत:’ या ऋग्वेदातील उक्तीप्रमाणे उत्तम ते ते स्वीकारले. त्यामुळेच भारतीय सांस्कृतिक परंपरा विविधतेने नटलेली दिसते. भारतीयांनीही या संस्कृती- परंपरांचे जतन व संवर्धन केल्याने युगानुयुगे या परंपरा टिकून आहेत. महाराष्ट्र या परंपरेत अग्रस्थानी आहे. भोंडला, भुलाबाई, हादगा हा असाच महाराष्ट्रातील स्त्रियांचा उत्सव.

महाराष्ट्रातील विविध भागात स्त्रिया वेगवेगळ्या नावाने भोंडल्याची परंपरा पाळत असल्याचे दिसते. पश्चिम महाराष्ट्रात भोंडला, खान्देश, विदर्भात भुलाबाई तर कोकणात हादगा या नावाने ही पारंपरिक लोककला जोपासलेली दिसते. आश्विन महिन्यात हस्त नक्षत्रात प्रतिपदेपासून सुरू होणारा हा उत्सव. अंगणात मधोमध हत्तीची प्रतिमा काढून त्याची पूजा करत, फेर धरून विविध गाणी गात १६ दिवस भोंडला खेळला जातो.

ऐलमा पैलमा गणेश देवा,

माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा

माझा खेळ मांडीला वेशीच्या दारी,

पारव घुमतय बुरुजावारी,

बुरुजावारी फकिराचे गुंजावाणी डोळे,

गुंजवणी डोळ्याच्या सारविल्या टीका

असे म्हणत गणरायाला साकडे घातले जाते. स्त्रीच्या शीलाकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्या मुघल राज्यकर्त्यांविषयीची चीड ही महिला गाण्यातून व्यक्त करताना दिसतात. आश्विन महिन्यात सूर्याचे भ्रमण हस्त नक्षत्रात असते. नक्षत्र मालिकेतील हे तेरावे नक्षत्र. या कालावधीत पाऊस पडला तर तो हस्ताने शेतकऱ्यांना दिलेला आशीर्वाद असे मानले जाते म्हणूनच मेघाचे, समृद्धीचे, जलतत्त्वाचे प्रतीक असणाऱ्या हत्तीची भोंडला खेळून सांकेतिक पूजा केली जात असावी.

हस्त हा जीवनाचा राजा, पावतो जनांचिया काजा, तयासी नमस्कार माझा।। 

नवसंजीवनी लेवून येणारा हस्ताचा पाऊस पिकांची समृद्धी घेऊन येतो. निसर्गाने बहरलेली धरती फुल, पाने, धान्याची समृद्धी लेवून धरणीला सुजलाम सुफलाम करून जाते; हस्त नक्षत्रालाच हादगा म्हटले जाते. ‘हादगा’ म्हणजे मेघांचीच प्रतीकात्मक पूजा. म्हणून हादगा-भोंडला हा पृथ्वीच्या सुफलीकरणाचा उत्सव असे मानले जाते; हस्ताची पूजा एक प्रकारे चैतन्यपूजाच! हत्ती शक्तीचं, बलाचं प्रतीक आहे.

हादगा देव मी पूजिते, संख्यांना बोलविते

अशाप्रकारे सर्वांना सोबत घेऊन सामूहिकता, एकता, समतेचा संस्कार आपोआप मनात रुजविणारा हा लोकोत्सव.

खान्देश, विदर्भात याच कालावधीत विराजमान होतात ‘भुलाबाई.’ भुलाबाई म्हणजे शिवपार्वती जगन्माता पार्वती म्हणजे साक्षात भूमाताच! या उत्सवाची कथा सांगताना असे म्हटले जाते की, एकदा शंकर पार्वती सारीपाट खेळत असताना त्या सारीपाटाच्या डावात पार्वती जिंकते आणि शंकर पार्वतीवर रुसून निघून जातात. पार्वती भिल्लिणीचे रूप घेऊन त्यांचा शोध घेते. शंकर भिल्लरूपात तिला भेटतात. इथल्या या भिल्ल शब्दाचा अपभ्रंश होऊन भिल्लिणीची भुलाबाई आणि भिल्लाचे भुलोजी झाले असावे. म्हणूनच हा उत्सव पार्वतीचा म्हणजे भूमातेचा सर्जनोत्सव होय.

डोई माठ पाण्याला जाई,

भुलाबाई ग माझी भुलाबाई

भाद्रपद पोर्णिमा ते आश्विन पौर्णिमा एक महिना ‘भुलाबाई महोत्सव’ साजरा केला जातो. इनामगांव, चांडोली येथील उत्खनन्नात एका मातीच्या पेटीवर स्त्रीची मृण्मय मूर्ती सापडली. ही मृण्मय मूर्ती भुलाबाईची असावी असा कयास केला जातो. ताम्रपाषाण युगातील ही लोकपरंपरा सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वीची असावी, असा उल्लेख काही पुस्तकात आहे. हादगा, भुलाबाई, भोंडल्याची साधी, सोपी बोली भाषेतील लोकगीत मौखिक स्वरूपात पिढ्यान् पिढ्या वहन होत आलेली आहेत. या गाण्यांमध्ये गणपती, राम, कृष्ण इ. देवांची व विविध नात्यांवर आधारलेली गाणी अधिक आढळतात.

‘कृष्ण घालीतो लोळण’ सारख्या गीतातून हट्टी कृष्णाच्या बाललीलांनी महिलांना घातलेली मोहिनी दिसते, तर ‘राधा रुसली सुंदरी, समजावितो तिला हरी’ गाण्यात समंजस श्रीकृष्ण दिसतो. आपल्या राजाप्रतीचा अभिमान ‘शिवाजी अमुचा राजा’ तून प्रदर्शित होतो, तर काही गीतात स्त्री मनाचा भाबडा वेध, भावभावना, दु:ख, वेदना, हळवेपणा, जीवनातील संघर्ष, यातून फुलत जाणारे स्त्रीजीवन अशा अनेकविध गोष्टीचे वर्णन दिसून येते. खिरापत ओळखणे हाही उत्सवातील मोठा सोहळाच.

आज काळ बदलत असला तरी परदेशांतही भारतीय उत्सव अभिमानाने उत्साहात साजरे होताना दिसतात. भारतीय संस्कृती व परंपरांशी आपली नाळ अशीच कायम जोडलेली रहावी, यासाठी अशा लोकपरंपरांचे जतन, संवर्धन होणे आवश्यक आहेच. सामूहिक, संघटित, समरस जीवनाचे शिक्षण देणाऱ्या या उत्सवाचे स्वरूप काळानुरूप बदलत राहील; परंतु हा भारतीय संस्कृतीचा वारसा वहन होत रहाणे महत्त्वाचे आहे. या कार्यात आपलाही खारीचा वाटा मोलाचाच होय.

(लेखिका भारतीय सांस्कृतिक परंपरेच्या अभ्यासक आहेत. भोंडल्यावर आधारित ‘सर्जनोत्सव’ या पुस्तकाचे लेखन त्यांनी केले आहे.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT